सांगली जिल्ह्यात ९० लाखांची वीज चोरी; कशी केली चोरी, ग्राहकांची संख्या किती.. वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 15:34 IST2024-12-11T15:33:35+5:302024-12-11T15:34:00+5:30
महावितरणकडून वीज ग्राहकांवर कारवाई

सांगली जिल्ह्यात ९० लाखांची वीज चोरी; कशी केली चोरी, ग्राहकांची संख्या किती.. वाचा सविस्तर
सांगली : महावितरणच्या विद्युत तारावर हूक टाकून, मीटरमध्ये छेडछाड करून आणि घरगुती वीज कनेक्शन घेऊन व्यावसायिक वापर करण्याचे ४५७ वीजचोरीचे प्रकार महावितरणच्या पथकाने उजेडात आणले. ही वीज चोरी ९० लाख १३ हजार रुपयांची आहे, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात वीज चोरीच्या घटना वाढल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. या तक्रारींनुसार महावितरणकडून विशेष भरारी पथके तयार केली होती. या पथकाने २०२४ या आर्थिक वर्षात ४५ वीज ग्राहकांनी घरगुती विद्युत कनेक्शन घेऊन त्याचा व्यावसायिक वापर केला होता. या ग्राहकांनी नऊ लाख ४६ हजार रुपयांची वीज गैरमार्गाने वापर केला आहे, तसेच महावितरणच्या विद्युत तारांवर हूक टाकून विजेचा वापर करणारे २६८ वीज ग्राहक आढळून आले आहेत.
या ग्राहकांनी ३६ लाख ४१ हजार रुपयांची वीज चोरी केली आहे, तसेच मीटरमध्ये बदल करून वीज वापरणारे १४४ वीज ग्राहक दिसून आले आहेत. या ग्राहकांनी ४४ लाख २६ हजार रुपयांची वीज चोरी केली होती. या वीज चोरांवर महावितरणच्या पथकाने विशेष कारवाई करून संबंधितास दंडासह वीज बिलाची रक्कम भरण्याची नोटीस दिली आहे. दंडासह रक्कम न भरल्यास संबंधित वीज वापरकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असेही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
वीजचोरांची संख्या
वीजचोरीचा प्रकार - ग्राहक संख्या - वीज चोरीची रक्कम
- हूक टाकून चोरी - २६८ - ३६४१०००
- घरगुतीचा व्यावसायिक वापर - ४५ - ९४६०००
- मीटरमध्ये बदल - १४४ - ४४२६०००