सांगली जिल्ह्यात दोन लाख ग्राहकांच्या वीज बिलांची थकबाकी २७ कोटींवर, किती ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला..वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 18:38 IST2026-02-20T18:37:41+5:302026-02-20T18:38:24+5:30
महावितरणकडून कारवाईची विशेष मोहीम

सांगली जिल्ह्यात दोन लाख ग्राहकांच्या वीज बिलांची थकबाकी २७ कोटींवर, किती ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला..वाचा
सांगली : विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा भरणा नियमित होत नसल्याने महावितरणच्या घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील दोन लाख चार हजार ८६५ ग्राहकांकडे २७ कोटी रुपयांची थकबाकी झाली आहे. यामुळे गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील तीन हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे थकबाकीदार वीजग्राहकांनी बिलांचा भरणा देय दिनांकापूर्वी करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून केले आहे.
जिल्ह्यातील सांगली शहर विभागात ४२ हजार ३३ ग्राहकांकडे ६ कोटी ५२ लाख, सांगली ग्रामीण विभागात ४१ हजार ४८८ ग्राहकांकडे ३ कोटी ९३ लाख, इस्लामपूर विभागात ४४ हजार २८६ ग्राहकांकडे ७ कोटी ३१ लाख, कवठेमहांकाळ विभागात ३४ हजार ४६ ग्राहकांकडे ३ कोटी ४७ लाख व विटा विभागात ४३ हजार १२ ग्राहकांकडे ५ कोटी ६० लाख रुपयांची थकबाकी आहे. यामुळे जिल्ह्यातील २ हजार ९२७ ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित केला आहे, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
थकीत वीजबिलांचा भरणा करण्यास सोईचे व्हावे यासाठी जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र मार्च २०२६ अखेरपर्यंत शनिवारी, रविवारी व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. या थकीत बिलांचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.