निवडणूक खर्चाचे दरपत्रक जाहीर; नाष्टा, भोजनासह प्रचार साहित्यासाठी किती रुपये खर्च करता येणार...वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 19:16 IST2025-11-21T19:15:59+5:302025-11-21T19:16:41+5:30
Local Body Election: उमेदवारांच्या खर्चावर प्रशासनाची करडी नजर ; पैशाची उधळपट्टी ठरणार धोक्याची घंटा

निवडणूक खर्चाचे दरपत्रक जाहीर; नाष्टा, भोजनासह प्रचार साहित्यासाठी किती रुपये खर्च करता येणार...वाचा
सांगली : नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून आता उमेदवार रणांगणात दंड थोपटून उभे ठाकले आहेत. निवडणुकीचा खर्च जाहीर झाला आहे, मात्र ही खर्च मर्यादा कमी असतानाही उमेदवारांचा हात मोकळा असतो. मात्र, निवडणूक विभागाने दरपत्रक जाहीर केल्याने आता उमेदवारांना खर्चाच्या बाबतीत हात आवरता लागणार आहे. निवडणुकीचा खर्च याच दरांमध्ये करावा लागणार आहे. यामध्ये पाण्याची बॉटल २० रुपये, नाश्ता १५ रुपये, शाकाहारी भोजन १२० रुपये याचा समावेश आहे.
जिल्ह्यातील उरुण-ईश्वरपूर, आष्टा, पलूस, तासगाव, विटा, जत नगरपरिषद आणि आटपाडी, शिराळा नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम ४ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू झाली आहे. त्यानंतर १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज सुरू झाले. शेवटच्या दिवसापर्यंत अधिकृत उमेदवारीसाठी प्रतीक्षा असल्याने शेवटच्या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची चांगली गर्दी झाली. अखेर मंगळवार, १८ नोव्हेंबर रोजी दाखल नामांकन अर्जाची छाननी करण्यात आली.
नामांकन अर्ज दाखल झाल्यापासून उमेदवाराला निवडणूक खर्चाचा हिशेब ठेवावा लागणार आहे. उमेदवाराला पावतीसह नियमित खर्च नोंदवहीत ठेवावा लागेल. मात्र, हा खर्च निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या दरपत्रकानुसार सादर करावा लागेल.
या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी जिल्हानिहाय उमेदवारांकडून निवडणुकीत होणाऱ्या मुख्य खर्चाची स्थानिक स्तरावर प्रचलित दर राजकीय पक्षांशी चर्चा करून निश्चित केली आहेत. त्यामुळे आता या दरानुसारच खर्च करावा लागेल.
कार्यालयाचे स्वागत गेट, प्रचार कार्यालय व हारतुरेचे ही दर ठरले
प्रचार कार्यालय, सभा, बैठकीसाठी स्वागत गेट १२०० रुपये प्रती नग, गादी १५ रुपये प्रती नग, पोडियम १०० रुपये, शामियाना १० रुपये चौरस फूट, डोम ३५ रुपये चौरस फूट, बुके २०० रुपये, स्टॅन्ड फॅन २५० रुपये, मोठा फॅन ३०० रुपये, साऊंड सिस्टीम (दोन स्पीकर, दोन भोंगे) १५०० रुपये, बॅनर १८ रुपये फूट, झेंडे २५ रुपये प्रती नग, तर कापडी टोपी २५ रुपये नग ह्या दरांवर नोंद होणार आहे. या दरपत्रकानुसार उमेदवारांना निवडणूक खर्च कक्षात सादर करावा लागणार आहे.
उमेदवारांवर कारवाई होईल
उमेदवारांकडून प्रचारामध्ये वाढता आवश्यक खर्च, मोठमोठे फलक, आकर्षक प्रचार मोहीम आणि पैशांच्या देवाणघेवाणीवर अंकुश आणण्यासाठी हे नियम लागू करण्यात आले आहेत. यासाठी व्हिडीओ कॅमेऱ्यांचा ही वापर राहणार आहे. खर्च मर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांवर कारवाई केली जाणार आहे.
कॉफी १५ रुपये, शीतपेय २० रुपये
दरपत्रकानुसार नाश्ता १५ रुपये प्लेट, मिसह, पावभाजी, पुलाव प्लेटसाठी ४० रुपये, शाकाहारी भोजन १२० रुपये, मांसाहारी भोजन २०० रुपये, चहा ७ रुपये, कॉफी १५ रुपये, तर शीतपेय किंवा ज्युस २० रुपये दराने होणार आहे. याशिवाय बॅण्ड पथक, ढोलताशा गाडीसह ५ माणसे असल्यास १०११ रुपये प्रती तास, प्रतिदिन ६ हजार रुपये; १० माणसांसाठी हा दर दुप्पट लागेल. तर १० माणसं असलेली बँजो पार्टी असल्यास प्रती तास ६ हजार रुपये, तर प्रतिदिवस २१ हजार रुपये दर असेल.