तिसऱ्या मजल्यावरुन पडून सांगलीत वृद्ध ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 14:07 IST2017-10-24T13:38:25+5:302017-10-24T14:07:44+5:30
तिसऱ्या मजल्यावरील जिन्यावरुन पडल्याने कुंडलिक राघवेंद्र प्रभू (वय ७५, रा. पंचमुखी मारुती रस्ता, सांगली) ठार झाले. सोमवारी सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. घटनेची शहर पोलिस ठाण्यात नोंद आहे.

तिसऱ्या मजल्यावरुन पडून सांगलीत वृद्ध ठार
सांगली , दि. २४ : तिसऱ्या मजल्यावरील जिन्यावरुन पडल्याने कुंडलिक राघवेंद्र प्रभू (वय ७५, रा. पंचमुखी मारुती रस्ता, सांगली) ठार झाले. सोमवारी सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. घटनेची शहर पोलिस ठाण्यात नोंद आहे.
कुंडलिक प्रभू दररोज सकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेत तिसऱ्या मजल्यावरील जिन्यावर जाऊन वृत्तपत्र विक्रेता व दूधवाला आला का, हे पाहत असत. सोमवारी सकाळीही ते दररोजच्या सवयीप्रमाणे जिन्यावर गेले होते. जिन्यातून ते बाहेर वाकून पाहत असताना त्यांचा अचानक तोल गेला व ते फरशीवर पडल्याने गंभीर जखमी झाले.
डोक्याला लागल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला होता. त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने मुलगा, पुतण्या, सून व नातवंडांनी धाव घेतली. त्यांना उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरु असताना दुपारी त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला.