मिरज तालुक्यातील सिद्धेवाडीत स्कूल बस उलटून आठ विद्यार्थी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 15:37 IST2022-04-26T15:36:49+5:302022-04-26T15:37:01+5:30
मद्यधुंद अवस्थेतील बदली चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

मिरज तालुक्यातील सिद्धेवाडीत स्कूल बस उलटून आठ विद्यार्थी जखमी
मिरज : सिद्धेवाडी (ता. मिरज) येथे सिध्देवाडी-खंडेराजुरी रस्त्यावरील व्हटकर मळ्याजवळ विद्यार्थी घेऊन जाणारी मिरजेतील तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूलची बस पलटी झाली. ही घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. यात आठ विद्यार्थी जखमी झाले. मद्यधुंद अवस्थेतील बदली चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
मिरजेतील खाडे इंग्लिश स्कूलचे सिध्देवाडी व भोसे येथील २५ विद्यार्थी घेऊन स्कूलबस सिध्देवाडी- खंडेराजुरी रस्त्यावरील व्हटकर मळा येथून जात होती. यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात पलटी झाली. या अपघातात भोसे येथील मयूर गुरव, संभव चावला, श्रद्धा पाटील, हर्षद पाटील यांच्यासह अन्य विद्यार्थी (नावे समजू शकली नाहीत) जखमी झाले. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढले. जखमी विद्यार्थ्यांना मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातानंतर घटनास्थळावरून बदली चालक पसार झाला.
भोसेचे सरपंच विकास चौगुले यांनी यावेळी मदत केली. चालक मद्यधुंद अवस्थेत होता, असे मदतीला गेलेल्या ग्रामस्थांनी सांगितले. घटनेची माहिती समजताच पालकही घटनास्थळी दाखल झाले. काही पालकांनी खासगी रुग्णालयात मुलांना उपचारासाठी दाखल केले. शाळा व्यवस्थापनाच्या बेजबाबदारपणाबाबत नाराजी व्यक्त केली.
शाळेने बदली चालक नेमताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली नाही. मद्यपी चालकामुळे हा अपघात झाला. शाळा प्रशासनाने यापुढे अशा दुर्घटना घडू नयेत, जखमी विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. - वैभव चव्हाण, भोसे