जाती-धर्माची मोट विस्कळीत करण्याचे प्रयत्न सुरु - तारा भवाळकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 17:21 IST2025-06-28T17:20:37+5:302025-06-28T17:21:00+5:30
वारी भांडवलशाही होत असल्याची टीका

जाती-धर्माची मोट विस्कळीत करण्याचे प्रयत्न सुरु - तारा भवाळकर
सांगली : महाराष्ट्रातील वारकरी संतांनी अंधश्रद्धेविरुद्ध लढा दिला. अंधश्रद्धेतून गरिबांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी झटले. वारकरी चळवळीने सर्व जाती-धर्मांची मोट बांधली. ही मोट विस्कळीत करण्याचे प्रयत्न सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. पुरोगामी चळवळीने यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे, असे प्रतिपादन ९८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी केले.
सांगलीत गुरुवारी पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या. त्यांनी लिहिलेल्या ‘अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये संत साहित्याचे योगदान’ व ‘वारकरी संप्रदायातील स्त्री संत’ या पुस्तकांचे प्रकाशन यावेळी झाले. कार्यक्रमाला अंनिसचे हमीद दाभोलकर, संत साहित्यांचे अभ्यासक सचिन परब, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते सुभाष पाटील, साहित्यिक डॉ. अनिल मडके, अंनिसचे राहुल थोरात आदी उपस्थित होते.
डॉ. भवाळकर म्हणाल्या, पूर्वी ग्रामसंस्कृती जातीभेदाने बुजबुजली होती. व्यक्तीच्या जातीनुसार त्याची कामे ठरायची. अशा श्रमकऱ्यांचे प्रतीक म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल होता. महाराष्ट्रातील वारकरी संत हे एकाच वेळी उच्चवर्णीयांच्या अहंकाराला आव्हान देत लढत होते. त्याचबरोबर गरीब लोकांतील अंधश्रद्धेविरुद्धही लढत होते. संत साहित्य म्हणजेच लोकसाहित्य. उच्चवर्णीय असूनही एकनाथांनी भारुडातून महिलांच्या समस्या मांडल्या.
संत साहित्याने शिवरायांनाही प्रेरणा दिली. या साहित्यानेच मराठी भाषा जिवंत ठेवली. परब म्हणाले, संत साहित्याने समाजातील चुकीच्या प्रवृत्तींवर थेट प्रहार केले. असे धाडस आज कोणीही करणार नाही. हमीद दाभोलकर म्हणाले, अंनिसची वाटचालही संत परंपरेला अनुसरूनच व्हावी, अशी भूमिका डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी मांडली होती. वारकरी परंपरेने देव नाकारणाऱ्यांनाही नाकारले नाही. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे, प्रकाशक अरविंद पाटकर आदी उपस्थित होते. राहुल थोरात यांनी सूत्रसंचालन केले.
वारीमार्गावर अन्नछत्रे कशासाठी?
डॉ. भवाळकर म्हणाल्या, वारकरी परंपरा कोणावरही अवलंबून नाही. काहीही फुकट घ्यायचे नाही, अशी तिची मानसिकता आहे. तरीही, सध्या वारीमार्गावर अन्नछत्रे दिसतात. ती वारकरी परंपरेत बसत नाहीत. वारीमार्गावर मांसबंदी, व्यसनांचा प्रचार, अन्नछत्रे यांची उभारणी विशिष्ट हेतूने सुरू आहे. आजची वारकरी परंपरा भांडवलशाहीकडे जाऊ लागली आहे.