चार्जिंग स्टेशन नसल्याने ई-शिवाई बसेसना ब्रेक; सांगली, मिरज व इस्लामपूर आगाराला प्रत्येकी ४० बसेस मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 18:32 IST2025-07-10T18:31:56+5:302025-07-10T18:32:16+5:30
इलेक्ट्रीक बसमध्ये अत्याधुनिक सुविधा

चार्जिंग स्टेशन नसल्याने ई-शिवाई बसेसना ब्रेक; सांगली, मिरज व इस्लामपूर आगाराला प्रत्येकी ४० बसेस मंजूर
प्रसाद माळी
सांगली : राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये सध्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून इलेक्ट्रीक ई-शिवाई बसेस धावत आहेत. परंतु, सांगलीकरांना अद्याप या इलेक्ट्रीक बसेसची प्रतीक्षाच करावी लागत आहे. इलेक्ट्रीक बसेससाठी आवश्यक चार्जिंग स्टेशन माधवनगर येथे उभारण्याचा प्रस्ताव सांगली विभागाकडून पाठविण्यात आला. तो मंजूर झाल्यावर सांगली आगाराला ई-शिवाई बसेस मिळणार आहेत. यासह मिरज व इस्लामपूर आगारांकडून चार्जिंग स्टेशनसाठीचे प्रस्ताव पाठवले जाणार आहेत. त्यामुळे तुर्तास सांगलीकरांच्या इलेक्ट्रीक बससचे घोडे चार्जिंग स्टेशनमुळे अडले आहे.
सांगलीसह मिरज व इस्लामपूरकरांनाही या बसेसची प्रतीक्षा लागून राहिली आहे. सागली, मिरज व इस्लामपूर आगारांसाठी प्रत्येकी ४० बसेस मंजूर आहेत. पण, चार्जिंग स्टेशन नसल्यामुळे या बसेस आगारांना अद्याप मिळाल्या नाहीत. सध्या सांगली, मिरज व इस्लामपूर येथून पुण्याला जाण्यासाठी शिवशाही व लालपरीचाच पर्याय आहे. कोल्हापूर, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, ठाणे, मुंबई, लातूर या आगारातून ई-शिवाई बसेस धावतात. पण, सांगलीकर या सुविधेपासून वंचित आहेत.
सांगली आगाराकडून इलेक्ट्रीक बसेससाठी माधवनगर येथे चार्जिंग स्टेशनसाठीचा प्रस्ताव सांगली विभागीय कार्यालयाने शासनाकडे पाठविला आहे. तो मंजूर झाल्यावर माधवनगर येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येईल. मिरज व इस्लामपूर आगाराकडून जागा निश्चिती झाल्यावर तोही प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यात सर्वप्रथम सांगली आगारात इलेक्ट्रीक बसेस दाखल होतील. या इलेक्ट्रीक बसेस सांगली - पुणे या मार्गावर धावतील.
इलेक्ट्रीक बसमधील अत्याधुनिक सुविधा
इलेक्ट्रीक ई-शिवाई बस वातानुकुलीत आहे. यामध्ये वाहन ट्रॅकिंग प्रणाली आहे. आयपी अनॉलॉग कॅमेरा आधारित पाळत ठेवण्याची यंत्रणा, प्रवाशांसाठी पॅनिक बटन, प्रवासी घोषणा प्रणाली आणि ॲन्ड्रॉइड टीव्ही, हवा गुणवत्ता फिल्टर, ड्रायव्हर केबिनमध्ये तापमान, आर्द्रता आणि हवा गुणवत्ता सेन्सर, प्रत्येक २ जगाांच्या गटासाठी युएसीबी स्वतंत्र चार्जर, वाहन आरोग्य देखरेख उपकरण आदी सुविधा उपलब्ध आहेत.
सांगली आगाराचा माधवनगर येथील चार्जिंगस्टेशनसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. तो लवकरच मंजूर होईल. सांगली आगाराला ४० ई-शिवाई बसेस मंजूर आहेत. चार्जिंगस्टेशन उभारणीनंतर इलेक्ट्रीक बस सांगलीकरांच्या सेवेत दाखल होतील. -सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, सांगली