यंदाच्या दसऱ्याला वाहन विक्रीचा ‘टॉप गिअर’, सांगली जिल्ह्यात किती कोटींची झाली उलाढाल.. वाचा
By घनशाम नवाथे | Updated: October 9, 2025 16:35 IST2025-10-09T16:33:30+5:302025-10-09T16:35:23+5:30
जीएसटी कपातीचा परिणाम

संग्रहित छाया
घनश्याम नवाथे
सांगली : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर जीएसटी दरातील कपातीमुळे वाहन विक्री सुसाट वेगाने झाल्याचे दिसून आले. घटस्थापना ते दसरा कालावधीत सांगली जिल्ह्यात तब्बल २८८३ वाहनांची विक्री झाली. जीएसटी दरातील कपातीमुळे यंदाच्या वर्षात वाहन विक्रीने गतवर्षीच्या तुलनेत ‘टॉप गिअर’ टाकल्याचे दिसले. त्यामुळे वाहन उद्योग क्षेत्राला मोठा ‘बूस्टर’ मिळाला. जिल्ह्यात तब्बल ११० कोटींहून अधिक उलाढाल या क्षेत्रात झाली.
गेल्या काही वर्षांत वाहनांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे दुचाकी असो की मोटार असो ती खरेदी करणे अनेकांसाठी स्वप्नवत ठरले आहे. दुचाकीची किंमत लाखाच्या पलिकडे पोहोचली आहे. मोटारींच्या किमतीदेखील साधारणपणे सहा लाखांपासून पुढे आहेत. साधारणपणे आठ वर्षांपूर्वी वाहनांच्या खरेदीसाठी जीएसटी आकारला जात आहे. त्यामुळे किमती वाढल्या होत्या. परंतु, यंदाच्या दसऱ्यापूर्वी जीएसटी दरात कपात निश्चित केल्यामुळे अनेकांना वाहन खरेदीचे स्वप्न साकारण्याची संधी मिळाली.
वाहन वितरकांनी प्रत्येक वाहन जीएसटी कपातीमुळे किती रुपयांना मिळणार? याची आकडेवारी जाहिरातरूपाने प्रसिद्ध केली. त्याचा परिणाम म्हणून ग्राहकांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर दारात नवीन गाडी आणण्यासाठी उत्साह दाखवला. अनेक शोरूममध्ये बुकिंगसाठी गर्दी दिसून आली. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्त साधताना जिल्ह्यात घटस्थापना ते दसरा या कालावधीत तब्बल २८८३ वाहनांची विक्री झाली. यामध्ये दुचाकींची सर्वाधिक विक्री झाली. त्यापाठोपाठ मोटार, ट्रॅक्टर, मालवाहतूक करणारी वाहने यांची विक्री अधिक झाली. दसऱ्यानंतर आता दिवाळी पाडव्यालादेखील मोठ्या प्रमाणात वाहन विक्री होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
गतवर्षीपेक्षा ६४६ वाहनांची विक्री जास्त
गतवर्षी घटस्थापना ते दसरा या कालावधीत २२३७ वाहनांची विक्री झाली होती. यंदा जीएसटी दरातील कपातीमुळे गतवर्षीच्या तुलनेत ६४६ वाहनांची विक्री जास्त झाली. यंदा २८८३ वाहनांची विक्री झाली. तसेच काही कमी ‘सीसी’ आणि वेग असलेल्या गाड्यांचीदेखील विक्री झाली आहे.
जीएसटी कपातीचा परिणाम
छोट्या मोटारीवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला. तसेच ३५० सीसीपर्यंतच्या दुचाकीवरील जीएसटीदेखील २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी केला. परिणामी मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला. त्यांनी खरेदीसाठी फायनान्सची मदत घेऊन उत्साह दर्शवला.
३० हजारांपासून ३० लाखापर्यंत कपात
दारात चारचाकी आणण्याचे अनेकांचे स्वप्न असते. ते यंदाच्या दसऱ्याला पूर्ण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. दसऱ्यानिमित्त अनेकांनी ३० हजारांपासून ते ३० लाखांपर्यंत जीएसटी कपातीचे सोने लुटले.
वाहन विक्रीचा उच्चांक
वाहनाचा प्रकार - विक्री
दुचाकी - १८७०
मोपेड - २०
मोटार - ७२५
ट्रॅक्टर - ११३
मालवाहतूक - ०५
ट्रेलर - १४
प्रवासी वाहतूक - १४
इतर वाहने - २२
एकूण - २८८३
गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या दसऱ्याला वाहन उद्योगात मोठी उलाढाल झाल्याचे चित्र दिसून आले. गतवर्षी घटस्थापना ते दसरा या कालावधीत जेवढ्या गाड्यांची आरटीओकडे नोंदणी झाली होती, त्यातुलनेत यंदा ६४६ जादा गाड्यांची नोंद झाली आहे. -प्रसाद गाजरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सांगली.