सांगलीत मद्यपी प्रियकराचा मध्यरात्री धिंगाणा, युवतीचा विनयभंग करत कुटुंबियांना केली मारहाण
By शीतल पाटील | Updated: October 24, 2022 18:18 IST2022-10-24T18:18:09+5:302022-10-24T18:18:47+5:30
एकतर्फी प्रेमातून ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’, असे सांगून युवतीचा विनयभंग केला.

सांगलीत मद्यपी प्रियकराचा मध्यरात्री धिंगाणा, युवतीचा विनयभंग करत कुटुंबियांना केली मारहाण
सांगली : शहरातील एका युवतीच्या घरात काल, रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास मद्यपी प्रियकराने धिंगाणा घालून युवतीचा विनयभंग केला. याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
सांगली-कोल्हापूर रस्ता परिसरात राहणाऱ्या रोशन खंदारे (वय २४) या युवकाचे एका युवतीवर एकतर्फी प्रेम आहे. रविवारी रात्री तो दारू ढोसून मध्यरात्री अडीचच्या सुमारास युवतीच्या घरी गेला. घराचे बंद दार मोठमोठ्याने ठोठावून त्याने आरडाओरडा केला. दार उघडत नसल्याचे पाहताच त्याने दारावर दगड फेकून मारण्यास सुरवात केली. पहाटेच्या सुमारास अचानक आरडाओरड्याचा आवाज आल्यामुळे परिसरातील नागरिक जागे झाले.
या कालावधीत तिच्या आईने दरवाजा उघडला. प्रेमी युवकाने आईस ढकलले आणि घरात प्रवेश केला. आतमध्ये गेल्यावर ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’, असे सांगून युवतीचा विनयभंग केला. यामुळे चिडलेल्या युवतीने त्याला ढकलून दिले. याचा राग येऊन त्याने तिच्या कानफटात मारली. भांडण सोडविण्याकरिता तिचे वडील आणि भाऊ मध्ये पडले असता दोघांनाही त्याने शिवीगाळ करून मारहाण केली. हा प्रकार अर्ध्या तासाहून अधिक वेळ सुरू होता. याबाबतची फिर्याद दाखल करण्यात आली. त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.