Sangli: बिऊर येथे बिबट्याच्या शोधासाठी डॉग स्कॉड दाखल, मृत बालकाच्या वारसांना नुकसान भरपाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 18:46 IST2026-02-04T18:43:37+5:302026-02-04T18:46:13+5:30
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती

Sangli: बिऊर येथे बिबट्याच्या शोधासाठी डॉग स्कॉड दाखल, मृत बालकाच्या वारसांना नुकसान भरपाई
शिराळा : बिऊर (ता. शिराळा) येथील बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यूची घटना नुकतीच घडली. वनविभागामार्फत पुणे येथील रेस्क्यू टीम आणि डॉग स्कॉड दाखल झाले असून बिबट्याचा शोध सुरू केल्याची माहिती कोल्हापूर विभाग मुख्य वनरक्षक (प्रादेशिक) जी गुरुप्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उपवनसंरक्षक सागर गवते, वनक्षेत्रपाल रमेश कांबळे, वनपाल अनिल वाजे उपस्थित होते. जी गुरुप्रसाद म्हणाले, पुणे रेस्क्यू टीम येथील स्थानिक कर्मचाऱ्यांना बिबट्याबाबत सर्व प्रशिक्षण देणार आहेत. सध्या सहा ड्रोन कॅमेरे आहेत. आता आणखी ३०-३५ ड्रोन कॅमेरे खरेदी करणार आहे. प्रत्येक गार्डकडे चार ड्रोन कॅमेरे देण्याची व्यवस्था करण्यात येईल. याचबरोबर रेस्कू टीमसाठी आवश्यक असणारे साहित्यही लवकरच पुरविण्यात येईल.
बिऊर येथील मृत राजवीर हणमंत पाटील यांच्या वारसांना आज पंचवीस लाख रुपयांची नुकसान भरपाई पैकी १० लाख रुपयांचा धनादेश व पंधरा लाख रुपयांची ठेव पावती दिल्याची माहिती त्यांनी दिली. कोल्हापूर विभाग मुख्य वनरक्षक जी गुरुप्रसाद घटनास्थळी भेट देऊन या परिसराची पाहणी करून तपासासाठी सूचना दिल्या.
विविध कर्मचारी कार्यरत
पुणे येथील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचे डॉग स्कॉड प्रमुख शोमीत भिडे, शुभम सिंग, रेस्कू टीमचे निनाद ताम्हणकर, सागर शिंदे, अभिलाष बनसोडे, वनक्षेत्रपाल रमेश कांबळे, वनपाल अनिल वाजे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, रजनीकांत दरेकर, प्राणीमित्र प्रा. सुशीलकुमार गायकवाड, धीरज गायकवाड, रेस्क्यू टीम सदस्य शिराळाचे नामदेव सिद, संतोष कदम, कोल्हापूर रेस्क्यू टीमचे प्रदीप सुतार, अल्माटीन बांदी हे बिबट्याच्या शोधासाठी प्रयत्नशील आहेत.