सांगली ‘एमडी’चे केंद्र; मुंबई, पुण्यासह देशभर ड्रग्ज पुरवठ्याचे धागेदोरे उघड, तस्करीत गुंतले तरुण
By घनशाम नवाथे | Updated: January 30, 2025 16:07 IST2025-01-30T15:49:20+5:302025-01-30T16:07:52+5:30
वर्षात दोन कारखाने उघडकीस, तब्बल पावणे सातशे कोटीचे एमडी जप्त

सांगली ‘एमडी’चे केंद्र; मुंबई, पुण्यासह देशभर ड्रग्ज पुरवठ्याचे धागेदोरे उघड, तस्करीत गुंतले तरुण
घनशाम नवाथे
सांगली : इरळी (ता. कवठेमहांकाळ) पाठोपाठ कार्वे (ता. खानापूर) येथे एमडी ड्रग्ज उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी छापा मारला. मांजर्डेतही कच्चा माल जप्त केला होता. कुपवाडमध्येही ३०० कोटीचे एमडी ड्रग्ज गतवर्षी जप्त केले. वर्षात तब्बल पावणे सातशे कोटीचे एमडी जप्त केल्यामुळे मुंबई, पुण्यासह देशभर सांगलीतून ड्रग्ज पुरवठ्याचे थेट कनेक्शन उघड झाले आहे. एकीकडे नशामुक्त अभियान सुरू असताना एमडी ड्रग्ज कारखानाच सुरू असल्याचे उघड झाले आहे.
कोकेननंतर महागडे म्हणून एमडी ड्रग्जची नशा मुंबई, पुणेसह बॉलिवूडमधील पार्ट्यांमधून केली जाते. एमडी ड्रग्जचा मास्टरमाइंड ललित पाटील याला पकडले गेल्यानंतर याची व्याप्ती देशभर पसरली असल्याचे स्पष्ट झाले. ड्रग्ज प्रकरणात २०११मध्ये कुपवाडमधील आयुब मकानदार याला केटामाइनचा साठा केल्याबद्दल अटक केली. त्याला शिक्षा झाल्यानंतर कारागृहात एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांशी ओळख झाली. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने कुपवाडमध्ये मीठाच्या गोण्यामध्ये एमडी ड्रग्जचा साठा करून ठेवला होता.
फेब्रुवारी २०२४मध्ये त्याच्याकडून तब्बल ३०० कोटीचे एमडी ड्रग्ज पुणे पोलिसांनी जप्त केले होते. त्यानंतर मार्चमध्ये मुंबई क्राइम ब्रँचने इरळी (ता. कवठेमहांकाळ) मध्ये शेतातील एमडी उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर छापा मारून २४५ कोटी रुपयांचे १२२.५ किलो एमडी जप्त केले. सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषणने एप्रिलमध्ये मांजर्डे (ता. तासगाव) येथून इरळीतून कारखान्याला पुरवला जाणारा एमडीचा कच्चा माल जप्त केला.
कोल्हापूर पोलिसांनी नुकतेच सांगलीतील दोघांना एमडी ड्रग्ज पुरवताना अटक केली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी कार्वे (ता. खानापूर) येथील कारखान्यातून २९ कोटीचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला. एक दोनवेळा नव्हे, तर वर्षात तब्बल चारवेळा एमडी ड्रग्जचे सांगली कनेक्शन उघड झाले. ब्राऊन शुगर, गांजा, केटामाइननंतर आता एमडी ड्रग्ज तस्करीचे सांगली ‘सेंटर’ बनले आहे. स्थानिक यंत्रणेला चकवा देत एमडी ड्रग्जचे कारखाने सुरू होऊ लागल्यामुळे चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
कार्वेत बिनबोभाटपणे कारखाना
विटा शहरापासून दूर कार्वेतील औद्योगिक वसाहतीमध्ये बंद शेडमध्ये परफ्यूमच्या नावाखाली अवघ्या दोन महिन्यात एमडी ड्रग्जचा कारखाना उभारला गेला. उत्पादनही सुरू झाले. शेजारी कोणताच कारखाना नाही. काही अंतरावरील कारखान्यातील कोणालाच माहिती पडली नाही. समोर महावितरणच्या उपकेंद्रातून वीज जोडली गेली. परप्रांतीय येऊन एमडी बनवू लागले. औद्योगिक वसाहतीच्या अधिकाऱ्यांनाही याची माहिती पडली नाही. उत्पादन सुरू होऊन माल तयार होऊन बाहेरही पाठवला गेला. त्यानंतर छापा पडला.
धोकादायकपणे उत्पादन
कार्वेतील कारखान्यात एमडी जप्त केल्यानंतर आजूबाजूला मास्क पडल्याचे दिसून आले. उत्पादन करताना ग्लोव्हजचा वापर केला जात होता. केवळ वासानेच डोके गरगरणे तसेच डोळे चुरचुरत असल्याचे बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी सांगितले. त्यावरून परप्रांतीय कामगार धोकादायकपणे उत्पादन करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तस्करीत गुंतले अनेक तरुण
बलगवडेचा प्रवीण शिंदे, त्याचे साथीदार वासुदेव जाधव, प्रकाश मोहिते, विकास मलमे, अविनाश माळी, मांजर्डेचा प्रसाद मोहिते, कुपवाडचा आयुब मकानदार, साथीदार अक्षय तावडे, रमजान मुजावर, सांगलीतील अथर्व सरवदे, संतोष पुकळे त्यानंतर विट्याजवळील बलराज कातारी अशी एमडी ड्रग्जच्या उत्पादन आणि तस्करीतील संशयित आतापर्यंत पकडले गेले आहेत. जिल्ह्यात आणखी कोठे नेटवर्क पसरले आहे, याचा पोलिस शोध घेत आहेत.
म्याव-म्याव, कॅट अन् चॉकलेट नावाने विक्री
एमडी ड्रग्जच्या एका ग्रॅमची किंमत ३ ते ४ हजार रुपये आहे. बॉलिवूड पार्ट्यांसह मुंबई, पुण्यात याची तस्करी होते. ‘म्याव - म्याव’, कॅट, चॉकलेट, चावल, कॉटर आदी वेगवेगळ्या नावाने याची विक्री होते. चरस, गांजा, कोकेन, केटामाइनची जागा आता एमडीने घेतली आहे. पावडर किंवा गोळ्याच्या स्वरुपात ते बनवले जाते. काहीजण गुटख्यातून तसेच पाण्यातून तोंडावाटे या ड्रग्जची नशा करतात.
ड्रग्ज तरी औषधाच्या व्याख्येत नाही
एमडी ड्रग्ज अशा नावाने याची विक्री होत असली तरी ड्रग्ज अर्थात औषधाच्या व्याख्येत याचा समावेश होत नाही. त्यामुळे याचा परवाना देण्यावर कोणाचा अंकुशच नाही. फक्त अंमली पदार्थविरोधी कायद्याच्या व्याख्येत याचा समावेश असल्यामुळे कारवाई केली जाते.
जिल्ह्यातही एमडीची नशा
सांगलीत, मिरजेत नुकतेच नशेच्या इंजेक्शनचा साठा, गोळ्या पकडल्या गेल्या. परंतु, काही मोठ्या हॉटेलमध्ये तसेच परप्रांतीय तरुणांना एमडी ड्रग्जचा पुरवठा केला जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. सांगलीतील हॉटेल मालकाच्या मुलासह साथीदाराला कोल्हापुरात पकडले गेल्यामुळे स्थानिक भागात तुरळक प्रमाणात विक्री होत असल्याचा संशय आहे. याची व्याप्ती वाढली, तर अनेक तरुण नशेच्या खाईत जातील, अशी शक्यता आहे.