लोकसभा निवडणूक पूर्वरंग: आणीबाणीने सत्ता गेली, तरी सांगलीत काँग्रेसच आली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 06:24 PM2024-04-03T18:24:41+5:302024-04-03T18:27:00+5:30

१९७१ ची लोकसभा व १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सर्वत्र विजय होऊन इंदिरा गांधी यांचा एकछत्री अंमल प्रस्थापित झाला. ...

Despite losing power due to the Emergency, Ganpati Tukaram Gotkhinde won the 1977 Lok Sabha elections from Sangli constituency | लोकसभा निवडणूक पूर्वरंग: आणीबाणीने सत्ता गेली, तरी सांगलीत काँग्रेसच आली

लोकसभा निवडणूक पूर्वरंग: आणीबाणीने सत्ता गेली, तरी सांगलीत काँग्रेसच आली

१९७१ ची लोकसभा व १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सर्वत्र विजय होऊन इंदिरा गांधी यांचा एकछत्री अंमल प्रस्थापित झाला. पाठोपाठ बांगलादेश मुक्तीमध्ये इंदिरा गांधी यांनी मोलाची कामगिरी बजावल्यामुळे त्यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती. मात्र, बांगलादेश मुक्तीसाठी झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धामुळे देशात महागाई भडकली होती.

१९७१ ते १९७४ या तीन-चार वर्षांच्या काळातच देशातील वातावरण पलटून गेले. लोकांमधील या असंतोषाची ठिणगी गुजरातमध्ये पडली. भारतात धुसफुसत असलेल्या असंतोषाचे प्रतीक बनून नवनिर्माण चळवळ पेटली. पुढे १९७४ मध्ये बिहारमध्ये जयप्रकाश नारायण प्रणीत संपूर्ण क्रांतीची चळवळ सुरु झाली. १८ मार्च १९७४ रोजी विद्यार्थ्यांनी विधानसभेला घेराव घातला. तेव्हा झालेल्या पोलिस कारवाईत २७ जणांचा बळी गेला. या घटनेनंतर जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण क्रांती चळवळीला व्यापक प्रतिसाद मिळू लागला.

गुजरात व बिहार येथे आंदोलने पेटलेली होती. देशभर सरकारविरोधी वातावरण तयार होऊ लागले. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला होता. या साऱ्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी यांच्याविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात एक खटला दाखल झाला. १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत रायबरेली मतदारसंघातून पराभूत झालेले समाजवादी नेते राजनारायण यांनी इंदिरा गांधींनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब केलेला आहे. त्यांची निवडणूक रद्द केली जावी, अशी याचिका दाखल केली होती.

१२ जून १९७५ रोजी न्यायालयाने निर्णय जाहीर केला व त्यात इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवली गेली. न्यायालयाच्या निर्णयामुळे विरोधी पक्षांच्या इंदिराविरोधी मोहिमेला आणखीच जोर चढला व त्यांनी इंदिराजींचा राजीनामा मागितला. त्यामुळे अलाहाबाद न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. २५ जून १९७५ रोजी न्यायाधीश व्ही.आर. कृष्ण अय्यर यांनी इंदिरा गांधी पंतप्रधान म्हणून काम करू शकतात. मात्र, लोकसभा सदस्य म्हणून सभागृहाच्या कामकाजात व मतदानात त्यांना भाग घेता येणार नाही, असा निर्णय दिला.

दरम्यान, देशाअंतर्गत असुरक्षितता आणि बंडाळी हे कारण देऊन २५ जून १९७५ रोजी इंदिरा गांधी यांनी घटनेच्या कलम ३५२ अंतर्गत देशात आणीबाणी घोषित केली. आणीबाणीच्या कालखंडात इंदिरा गांधी यांनी विरोधी पक्षांच्या सर्व नेत्यांना तुरुंगात घातले. तसेच वृत्तपत्रे व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा संकोच केला. जनतेमध्ये अंतर्गत मोठा असंतोष होता. परंतु वरवर सर्व परिस्थिती आलबेल दिसत होती. परिणामी इंदिरा गांधी यांनी १८ जानेवारी १९७७ रोजी आणीबाणी शिथिल केली. पाचवी लोकसभा बरखास्त करण्याची घोषणा केली.

संयुक्त जनता पक्षाची स्थापना..

लोकसभा बारखास्तीच्या घोषणेनंतर त्वरितच संघटना काँग्रेस, समाजवादी पक्ष, जनसंघ व भारतीय लोकदल या पक्षांनी आपल्या चार पक्षांचे विलीनीकरण करून संयुक्त अशा जनता पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. मार्च १९७७ मध्ये झालेल्या निवडणुकीतही भारतीय लोकदलाचे 'नांगरधारी शेतकरी' हेच निवडणूक चिन्ह जनता पक्षाने स्वीकारले.

इंदिराजींचा पराभव, मोरारजी पंतप्रधान..

१९७७ च्या लोकसभा निवडणुकीत ४६-सांगली मतदारसंघातून गणपती तुकाराम गोटखिंडे काँग्रेस यांना १,९२,१२५ मते मिळून विजयी झाले. तर जनता पक्षाचे वासुदेव दाजी जाधव यांना १,३५,८३१ मते मिळाली. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत आणीबाणीमुळे देशातील नागरी हक्क व लोकांचे स्वातंत्र्य स्थगित झाल्यामुळे केंद्र सरकार व इंदिरा गांधींना रोष पत्करावा लागला. इंदिरा गांधी व काँग्रेस पक्षाचा पराभव होऊन जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले. मोरारजी देसाई हे पंतप्रधान झाले.

- ॲड. बाबासाहेब मुळीक, ज्येष्ठ विधिज्ञ, विटा.

Web Title: Despite losing power due to the Emergency, Ganpati Tukaram Gotkhinde won the 1977 Lok Sabha elections from Sangli constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.