Crush child under school bus | स्कूल बसखाली चिरडून बालक ठार-: बालदिनी काळाचा घाला
स्कूल बसखाली चिरडून बालक ठार-: बालदिनी काळाचा घाला

ठळक मुद्दे सांडगेवाडीची घटना

पलूस : सांडगेवाडी (ता. पलूस) येथे स्कूल बसखाली चिरडून दोनवर्षीय बालक ठार झाले. कुषवंतसाई श्रीधर वल्लभनेने असे त्याचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी कुषवंतसाईची आजी पुष्पावती वल्लभनेने यांनी पलूस पोलिसात फिर्याद दिली आहे. स्कूल बसचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. बालदिनीच घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

गुड्डावल्लेरु (जि. कृष्णा, आंध्र प्रदेश) येथील श्रीधर व्यंकटेश्वरा वल्लभनेने पलूस येथे महामार्गाच्या कामावर गेल्या दोन वर्षापासून उपव्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. ते कुटुंबासह सांडगेवाडी येथे भाड्याच्या घरात राहत आहेत. त्यांना मन्वतसाई (वय ७) आणि कुषवंतसाई (२) ही दोन मुले आहेत. यातील मन्वतसाई पलूस येथील शाळेत दुसरीत शिकत आहे. गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास मन्वतसाई शाळेला बसमधून जाण्यासाठी निघाला होता. त्यावेळी त्याला सोडण्यासाठी आजी पुष्पावती व भाऊ कुषवंतसाई सोबत आले होते.

मन्वतसाई याच्या घरानजीक बस (क्र. एमएच १०, के ९०५१) आली. तो बसमध्ये बसल्यावर बस जाऊ लागली. याचवेळी कुषवंतसाई आजीचा हात सोडून बसच्या पुढील बाजूस गेला आणि बसखाली सापडला. त्याच्या ओरडण्याचा आवाज आल्याने बस जागीच थांबली. कुषवंतसाईच्या डोक्यास जोरदार मार बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता.

चालकावर गुन्हा
या घटनेनंतर कुषवंतसाईच्या कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस तेथे आले आणि त्यांनी चालकाला ताब्यात घेतले. याबाबत पुष्पावती यांनी पलूस पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बसचालक अविनाश पांडुरंग पाटील (२७, रा. घोगाव, ता. पलूस) याच्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

Web Title: Crush child under school bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.