Sangli-Local Body Election: आष्टा नगरपरिषदेसाठी कोट्यधीश उमेदवारांची गर्दी, सर्वात श्रीमंत कोण...वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 17:31 IST2025-12-05T17:30:38+5:302025-12-05T17:31:29+5:30
निवडणुकीसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहिती

Sangli-Local Body Election: आष्टा नगरपरिषदेसाठी कोट्यधीश उमेदवारांची गर्दी, सर्वात श्रीमंत कोण...वाचा
सुरेंद्र शिराळकर
आष्टा: नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी आष्टा शहर विकास आघाडीचे उमेदवार विशाल शिंदे हे सर्वाधिक श्रीमंत आहेत, तर राष्ट्रवादी आणि भाजपचे उमेदवार सतीश ऊर्फ प्रवीण माने हे गरीब उमेदवार ठरले आहेत. माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील हे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती समोर आली आहे.
सत्ताधारी गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विशाल शिंदे यांची स्थावर मालमत्ता ४ कोटी ५३ लाख, तर जंगम मालमत्ता १ कोटी ६६ लाख ७७ हजार २०० आहे. त्यांची एकूण मालमत्ता ६ कोटी १९ लाख ७७ हजार २०० आहे; तर प्रवीण ऊर्फ सतीश माने यांना स्थावर मालमत्ता नाही, तर जंगम मालमत्ता फक्त ७ लाख ५ हजार ५०० आहे.
माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील यांची स्थावर मालमत्ता १ कोटी २३ लाख ६० हजार ३०० असून जंगम मालमत्ता १४ कोटी ६० लाख आहे. ज्यामुळे त्यांची एकूण मालमत्ता १५ कोटी ८३ लाख ६० हजार ३०० रुपये आहे. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप वग्याणी यांची एकूण मालमत्ता २ कोटी ९६ लाख २ हजार ९५४ आहे; तर राजारामबापू कारखान्याचे माजी संचालक विराज शिंदे यांची मालमत्ता ४ कोटी ३२ लाख ९१ हजार ६९६ आहे.
शिवसेनेच्या वीर कुदळे यांची मालमत्ता ७२ लाख ९ हजार, तर भाजपचे अमोल पडळकर यांची मालमत्ता ४ कोटी ४९ लाख १२ हजार आहे. शिवक्रांती संघटनेच्या उज्ज्वला पाटील यांची मालमत्ता १ कोटी १८ लाख ४० हजार २०० आहे. माजी उपनगराध्यक्ष संगीता सूर्यवंशी यांची मालमत्ता १ कोटी २५ लाख ७०२२ असून, माजी उपनगराध्यक्ष विजय मोरे यांची मालमत्ता १ कोटी ३५ लाख ३७ हजार आहे.
रयत क्रांती पक्षाचे पांडुरंग बसुगडे यांची मालमत्ता १० लाख असून, अपक्ष उमेदवार दिग्विजय रबाडे यांची फक्त २५ हजार मालमत्ता असून ते सर्वांत गरीब उमेदवार ठरले आहेत. या यादीत काही उमेदवार कोट्यधीश, तर काही लक्षाधीश आहेत.