लग्नाला वर्ष होण्यापुर्वीच नवदाम्पत्याने संपवले जीवन, कारण अस्पष्ट; सांगलीतील येळावी येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 16:27 IST2023-06-30T16:17:07+5:302023-06-30T16:27:56+5:30
घटनेने परिसरात उडाली खळबळ

लग्नाला वर्ष होण्यापुर्वीच नवदाम्पत्याने संपवले जीवन, कारण अस्पष्ट; सांगलीतील येळावी येथील घटना
तासगाव : येळावी (ता. तासगाव) येथील राज संजय जाधव (वय २३) आणि त्यांची पत्नी ऋतुजा राज जाधव (वय २०) या नवविवाहित दाम्पत्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. बुधवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. ऋतुजा आणि राज यांचा अकरा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून याबाबत तासगाव पोलिसांत नोंद झाली आहे.
राज आणि ऋतुजा यांचा अकरा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. ऋतुजाचे माहेर सावर्डेतर्फे असंडोली (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील आहे. राज यांच्या घरी आई-वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे. बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास राज उलट्या करताना आवाज आल्याने घरातील नातेवाईक जागे झाले. त्यांनी खोलीचा दरवाजा उघडल्यानंतर राज उलट्या करत असल्याचे दिसून आले, तर ऋतुजा निपचित पडली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी दोघांनाही तात्काळ तासगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले. तिथून तासगाव ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच दोघांचेही निधन झाले होते.
अवघ्या अकरा महिन्यांपूर्वीच राज आणि ऋतुजा यांचा विवाह झाल्यानंतर दोघांनीही आत्महत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही. याबाबत तासगाव पोलिसात नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास बजरंग थोरात करत आहेत.
येळावीत हळहळ
राज जाधव निर्व्यसनी व कष्टाळू होता. गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास येळावी येथे दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ऋतुजाच्या माहेरचे नातेवाईकदेखील उपस्थित होते. मात्र, दोघांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.