ऊस वाहतुकीचा खर्च वाढला, कारखान्यांकडून दर मात्र दोन वर्षांपूर्वीचेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 11:56 AM2021-11-17T11:56:18+5:302021-11-17T11:59:05+5:30

दोन वर्षांपूर्वी डिझेलचा दर ६८ रुपये प्रतिलिटर होता. आता तो ९४ रुपयांपर्यंत गेला तरी कारखान्यांनी जुनेच वाहतूक दर कायम ठेवले आहेत.

The cost of transporting sugarcane has gone up but the rates from the factories are the same as two years ago | ऊस वाहतुकीचा खर्च वाढला, कारखान्यांकडून दर मात्र दोन वर्षांपूर्वीचेच

ऊस वाहतुकीचा खर्च वाढला, कारखान्यांकडून दर मात्र दोन वर्षांपूर्वीचेच

googlenewsNext

संतोष भिसे
सांगली : डिझेलसह विविध घटकांच्या दरवाढीने ऊस वाहतुकीचा खर्च ३० टक्क्यांनी वाढला आहे. साखर कारखान्यांनी मात्र दरवाढ दिलेली नाही. काही कारखान्यांनी दोन वर्षांपूर्वीचाच डिझेलचा दर गृहित धरुन करार केले आहेत.

दोन वर्षांपूर्वी डिझेलचा दर ६८ रुपये प्रतिलिटर होता. आता तो ९४ रुपयांपर्यंत गेला तरी कारखान्यांनी जुनेच वाहतूक दर कायम ठेवले आहेत. जिल्ह्यातील कारखान्यांचे या हंगामातील ऊस वाहतुकीचे दर १०० किलोमीटरपर्यंत सरासरी ४०० ते ५२० रुपये प्रतिटन असे आहेत. चालकांचे पगार गतवर्षीपेक्षा दोन हजारांनी वाढून १४ ते १५ हजारांपर्यंत गेले. दिवसभरात एक खेप केल्यानंतर ट्रक मालकाच्या पदरात हजार-पंधराशे रुपये पडतात. हंगामात दुरुस्ती काम निघाले तर २५ ते ५० हजारांचा खड्डा पडतो. व्यवसाय आतबट्ट्याचा झाला असला, तरी दोन वर्षे गाडीला कामच नसल्याने यंदा नाईलाजास्तव वाहने कारखान्याला जुंपल्याचे वाहतूकदारांनी सांगितले.

असा आहे हिशेब

- वाहतुकीचे जाता-येता अंतर - ७० किलोमीटर
- प्रतिटन सरासरी दर - ४५० रुपये
- १५ टनांसाठी मिळालेले भाडे - ६७५० रुपये
- डिझेल खर्च - ४००० रुपये
- चालक पगार - ५०० रुपये
- देखभाल-दुरुस्ती व घसारा - सरासरी १००० रुपये
- ट्रक मालकासाठी शिल्लक - १२५० रुपये

अशी वाढली महागाई

- डिझेल - ६८ रुपयांवरुन ९४ रुपये प्रतिलिटर
- टायर - ३० हजारावरुन ३५ हजार रुपये
- ऑईल - ३५० वरुन ५०० रुपये प्रतिलिटर
- चालक पगार - १३ हजारावरुन १५ हजार रुपये
- दुरुस्तीचा खर्च सरासरी २० ते ३० टक्के वाढला

हंगामात नऊ लाख मिळविले, पण...

गेल्या वर्षी हंगामाच्या अखेरीस एका ट्रक मालकाचे नऊ लाखांचे बिल कारखान्याकडून येणे होते. त्याचे तितकेच पैसे तोडणी मुकादमाकडे अडकून पडले होते. पैसे घेऊनही त्याने टोळ्या पाठविल्या नव्हत्या. त्यामुळे कारखान्याकडून बिल मिळालेच नाही. शेवटी त्याने वर्षभर मुकादमाकडून ३०-४० हजाराप्रमाणे निम्मी रक्कम वसूल केली. अजूनही साडेचार लाख रुपये येणे आहेत.

कारखान्यांनी दोन वर्षांपूर्वी वाहतुकीचे दर ठरवून दिले होते, ते आजपावेतो वाढविलेले नाहीत. वाहतूकदारांचे ऐकण्याची त्यांची मानसिकता नाही. ऊसतोडणीचा दर साखर संघाकडून निश्चित केला जातो, पण वाहतूकदार संघटित नसल्याने त्यांची लूट होते.  - नागेश मोहिते, वाहतूकदार, मांजर्डे (ता. तासगाव)

वीस-तीस लाखांचा ट्रक घ्यायचा, आणि महिन्याकाठी २५ हजार रुपये मिळवायचे असा हा व्यवसाय आहे. ट्रकची दुरुस्ती निघाली तर ३०-४० हजारांचा खड्डा पडतो. उसाच्या हंगामात मिळालेले चार पैसे पदरात पडतील याची हमी नसते. डिझेल आणि सुट्या भागांच्या वाढत्या किमतींमुळे अनेक ट्रकमालक कर्जाच्या खाईत लोटले गेले आहेत.  - नामदेव सोनूर, वाहतूकदार, तासगाव

Web Title: The cost of transporting sugarcane has gone up but the rates from the factories are the same as two years ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.