Coronavirus Unlock : कदमवाडीत कोरोनाबाधित कुटुंबाच्या घरातून २३ लाखाची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 17:21 IST2020-06-12T17:19:00+5:302020-06-12T17:21:33+5:30
कदमवाडी (ता. कवठेमहाकाळ) येथील कोरोनाबाधित महिलेच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारुन ४८ तोळे सोन्याचे दागिने व वीस हजार यांची रोकड लंपास केली. ही घटना गुरूवारी उघडकीस आली. याबाबत कवठेमहांकाळ पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

Coronavirus Unlock : कदमवाडीत कोरोनाबाधित कुटुंबाच्या घरातून २३ लाखाची लूट
ढालगाव : कदमवाडी (ता. कवठेमहाकाळ) येथील कोरोनाबाधित महिलेच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारुन ४८ तोळे सोन्याचे दागिने व वीस हजार यांची रोकड लंपास केली. ही घटना गुरूवारी उघडकीस आली. याबाबत कवठेमहांकाळ पोलिसांत गुन्हा दाखल आहे.
कदमवाडी येथील एका महिलेस ४ जून रोजी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने तिच्यावर मिरज कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यानंतर या महिलेच्या कुटुंबासह त्यांच्या शेजारी राहणाऱ्या भावकीतील इतर २२ जणांचे कवठेमहकाळ येथे इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे.
हा भाग कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे. कवठेमहांकाळ येथे इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनसाठी जावे लागल्याने घरातील महिलांनी जवळील सोने व पैसे घरातील एका पेटीत पर्समध्ये ठेवले होते. ४ जूनपासून त्यांचे घर बंद होते.
गुरुवारी दुपारी त्यांच्या घराशेजारील व्यक्ती संबंधित कुटुंबाच्या गोठ्यातील जनावराना चारा घालण्यास गेली असता, त्यांच्या घराचे कुलूप काढलेले दिसले. त्यांनी याची माहिती संबंधित कुटुंबास दिली.
नातेवाईकांनी तात्काळ कवठेमहांकाळ पोलिसांशी संपर्क साधला. कवठेमहकाळ पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कोळंबकर यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. प्राथमिक तपासात घरातील एका पेटीत असलेल्या पर्समधील तब्बल ४८ तोळे सोने व २० हजार रूपयांची रोकड चोरीस केल्याचे निष्पन्न झाले आहे. अधिक तपास सुरू आहे.