CoronaVirus InSangli: Three hundred beds reserved for Kovid patients in private hospitals in the district | CoronaVirus InSangli : कोविड रुग्णांसाठी जिल्ह्यात खासगी रुग्णालयांमध्ये तीनशे खाटा राखीव

CoronaVirus InSangli : कोविड रुग्णांसाठी जिल्ह्यात खासगी रुग्णालयांमध्ये तीनशे खाटा राखीव

ठळक मुद्देकोविड रुग्णांसाठी जिल्ह्यात खासगी रुग्णालयांमध्ये तीनशे खाटा राखीवउपचार सुविधा देण्याची खासगी रुग्णालयांची तयारी

मिरज : कोविडचे रुग्ण वाढत असल्याने शासनाने मोठ्या शहरातील खासगी रुग्णालयांत ८० टक्के खाटा राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अजून मर्यादित असली तरी, मिरजेतील वॉन्लेस, भारती हॉस्पिटल व इस्लामपूर येथील प्रकाश मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील प्रत्येकी ९० खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मिरजेतील खासगी रुग्णालयांनीही कोविड रुग्णांसाठी खाटा देण्याची तयारी दर्शविली आहे.

राज्यात मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरात कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने, शासकीय रुग्णालयातील खाटा अपुऱ्या पडत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने खासगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटा कोविड रुग्णांवर उपचारासाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

राखीव खाटांवर नियंत्रित दराने कोविड रुग्णांवर उपचार करावे लागणार आहेत. या निर्णयास मोठ्या शहरातील काही खासगी रुग्णालयांनी विरोध केला आहे. मिरजेतील खासगी रुग्णालय चालकांनी मात्र कोविड रुग्णांसाठी उपचार देण्याची तयारी असल्याचे सांगितले.

जिल्ह्यात कोविड रुग्णसंख्या आतापर्यंत मर्यादित आहे. मिरज कोविड रुग्णालयात सुमारे तीनशे रुग्णखाटा आहेत. सिव्हिलची यंत्रणा अपुरी पडत असल्यास कोविड रुग्णांसाठी खासगी रुग्णालयातील खाटा व उपचार सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे मिरज आयएमएचे अध्यक्ष डॉ. शशिकांत दोरकर यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाने आणीबाणीच्या प्रसंगासाठी मिरजेतील वॉन्लेस हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल व इस्लामपूर येथील प्रकाश मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील ९० बेड राखीव ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. वॉन्लेसचे संचालक डॉ. नथानिएल ससे यांनी, आवश्यकता भासल्यास कोविड रुग्णांवर उपचाराची तयारी असल्याचे सांगितले.

जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या पाचशेवर गेल्यास धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी असलेल्या ५० ते १०० खाटांच्या मोठ्या खासगी रुग्णालयांत कोविड रुग्णांवर उपचाराचे प्रशासनाने नियोजन केले आहे. कोरोना साथीमुळे रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याने खासगी रुग्णालयांतील खाटा कोविड रुग्णांसाठी उपलब्ध असल्याचे खासगी रुग्णालय चालकांनी सांगितले.

Web Title: CoronaVirus InSangli: Three hundred beds reserved for Kovid patients in private hospitals in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.