शिराळा : परतीच्या मान्सून पावसाने सांगली जिल्ह्यात संततधार हजेरी लावली आहे. काल, शुक्रवारी रात्री पासून वारणा धरणात क्षेत्रात पावसाने जोर धरल्याने धरणाचे चारही दरवाजे शनिवारी दुपारी एक वाजता एक फुटाने उघडण्यात आले आहेत. तसेच दोन्ही वीजनिर्मिती केंद्र सुरू करण्यात आले आहेत. धरणातून ५१०९ क्युसेकने विसर्ग सुरू झाला आहे. परिणामी वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे.वारणा धरण पाणलोट क्षेत्रात तसेच तालुक्यात पावसाने पूर्ण उघडीप दिली होती. धरणात पाण्याची आवक कमी झाल्याने दि.१९ रोजी दोन्ही दरवाजे तसेच वीजनिर्मिती केंद्र बंद करण्यात आली होती. धरण ९९.३१ टक्के भरले आहे. धरणातून दि.१ जून पासून आज अखेर ३४ टीएमसी पाणी सोडण्यात आले. परतीच्या पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने धरणात ११०० क्युसेकने पाण्याची आवक सुरू झाल्याने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यावर्षी चांदोली धरण परिसरात २,८४० मिमी पाऊस पडला आहे. तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शनिवारी सकाळी आठ ते दुपारी तीन पर्यंत पर्यंत पाथरपुंज ३७, निवळे ३८, वारणा धरण ४५ मिमी अशी पावसाची नोंद झाली आहे.पाणलोट क्षेत्रातील चोवीस तासातील पाऊस कंसात एकूण पाऊस (मिमी मध्ये)
- पाथरपुंज: ३० (७४६०)
- निवळे: २० (५२४८)
- धनगरवाडा: नोंद नाही दि.१९ पासून बंद
- चांदोली: २४ (२९०९)
- वारणावती:२३(२८४०)
मंडलनिहाय पाऊस (मिमी मध्ये)
- कोकरूड: २३(१५६५)
- शिराळा: नोंद नाही (७४७.१०)
- शिरशी: २४(१०९८)
- मांगले: १४(७८५.१०)
- सागाव: १८.५०(९५४.५०)
- चरण: २४.३०(२१२०.७०)
वारणा धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्यामुळे पाणी पातळी नियंत्रीत ठेवणे करिता धरणाच्या वक्र दरवाजाद्वारे ३४७९ क्युसेक व विद्युत गृहातून १६३० क्युसेक असा एकूण ५१०९ क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. - बाबासाहेब पाटील, उपविभागीय अभियंता वारणा धरण व्यवस्थापन