शिंदे सरकार मात्र केवळ राजकारणाचा पाढा वाचत बसले, विक्रम सावंतांची टीका
By शीतल पाटील | Updated: July 5, 2023 18:15 IST2023-07-05T17:54:59+5:302023-07-05T18:15:12+5:30
भाजपसोबत नेमके कशामुळे गेले हे महाराष्ट्राला माहीत

शिंदे सरकार मात्र केवळ राजकारणाचा पाढा वाचत बसले, विक्रम सावंतांची टीका
जत : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे ईडीचे सरकार आहे. ईडीचे सरकार बेरजेच्या राजकारणात मग्न आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. राज्यात अद्याप पावसाने हजेरी न लावल्याने शेतकरी चिंताग्रस्त असताना शिंदे सरकार मात्र केवळ राजकारणाचा पाढा वाचत बसले असल्याची टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जतचे आमदार विक्रम सावंत यांनी केली आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिंदे शासनामध्ये मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आ. सावंत यांनी प्रतिक्रिया दिली. सध्या सत्ता तिकडे चांगभलं असा कारभार सुरू आहे. केंद्रातील मोदी सरकार ईडीचा वापर करत आहे हे पुन्हा एकदा उघड झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे नेते अजित पाटील व नऊ जणांनी शिंदे सरकारमध्ये सामील होत, ज्या पद्धतीने शपथ घेतली ती पाहता राजकारणातील नैतिकता शून्य झाली आहे.
भाजपसोबत नेमके कशामुळे गेले हे महाराष्ट्राला माहीत
या मंडळींना भाजपचा पुळका आला म्हणून हे भाजपसोबत गेले नाहीत तर नेमके कशामुळे गेले हे महाराष्ट्राला माहीत आहे. भाजपने मोदी सरकारचा वरदहस्त घेत सरकार स्थापन केले असले तरी प्रत्यक्षात जनता त्यांच्यावर नाराज आहे. कर्नाटकात जो निकाल लागला त्याची पुनरावृत्ती २०२४ मध्ये महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही.