सदानंद औंधे
मिरज : मिरजेत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी नगरसेवक संजय मेंढे यांनी आपला पक्ष बाजूला सोडून मला मदत केली, असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी केला. मिरज पॅटर्नमुळेच विजयाचे गणित साकारले गेल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मिरजेत संजय मेंढे यांच्या प्रभागात ओढ्यावरील संरक्षण भिंतीच्या कामासाठी खाडे यांनी निधी मंजूर केला आहे. त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना खाडे यांनी विधानसभा निवडणुकीत मेंढे यांनी मदत केल्याचा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, मी खरे बोलतो त्यामुळे सर्वांना समाधान वाटते. त्यात वावगे काहीच नाही. बापू हे भाऊबरोबर असावेत असे सर्वांनाच वाटते. खाडे यांच्या वक्तव्यावर संजय मेंढे यांनी काहीही मत मांडले नाही. यावेळी सुरेश आवटी, करण जामदार, बबिता मेंढे उपस्थित होते.
खाडे यांच्या दाव्यात तथ्य नाही : मेंढे
याबाबत विचारणा केल्यानंतर संजय मेंढे म्हणाले, आ.खाडे बोलले म्हणून आम्ही त्यांचे काम केले असे होत नाही. यापूर्वीही आ.खाडे यांनी विरोधी उमेदवार मीच निवडतो, असे सांगितले होते. माझा व त्यांचा पक्ष वेगळा आहे, मी त्यांना निवडणुकीत मदत केली या दाव्यात तथ्य नाही.
नेत्यांची मदत नाही, जनतेची झाली
शिवसेनेचे उमेदवार तानाजी सातपुते म्हणाले, आमची निवडणुकीत काँग्रेससोबत युती असल्याने काही बोलता आले नाही. मी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. या नेत्यांनी मला मदत केली नसली तरीही जनतेने सहकार्य केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसच्या बैठकीत वाद
काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय मेंढे हे मिरजेत शिवसेनेच्या व सांगलीत अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात होते. त्यांनी सांगलीत अपक्ष उमेदवाराचा प्रचार केल्याचा मुद्दा मिरजेत काही दिवसापूर्वी झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत उपस्थित झाला. यावरुन त्यांचा व जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा वाद झाला होता. आता मिरजेत ते सोबत असल्याच्या आ. खाडे यांनी केलेल्या खुलाशामुळे काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकांऱ्यात खळबळ उडाली आहे.
खाडे यांच्या वक्तव्यामुळे संशयकल्लोळ
मिरज विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी नेत्यांनी यावेळी बदल घडविणारच असा निर्धार केला होता. परंतु, महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या मित्र पक्षांनी काँग्रेस नेत्यांवर विश्वास ठेवला व नेहमीप्रमाणे दगाफटका झाल्याचा संशय आमदार खाडे यांच्या वक्तव्यामुळे बळावला आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी विरोधकांसोबत हातमिळवणी केली तरीही कार्यकर्त्यांनी प्रामाणिक काम केल्याने शहरात भाजपला केवळ ९०० मताधिक्य मिळाल्याचेही गणित मांडले जात आहे