कडेगाव तालुक्यात काँग्रेस-भाजपात संघष
By Admin | Updated: February 2, 2015 00:13 IST2015-02-01T23:42:50+5:302015-02-02T00:13:48+5:30
राजकीय वातावरण तापले : चोवीसपैकी सोळा सहकारी सोसायट्यांमध्ये चुरर्स

कडेगाव तालुक्यात काँग्रेस-भाजपात संघष
कडेगाव : कडेगाव तालुक्यात २४ सहकारी संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. यापैकी १६ सहकारी सोसायट्यांमध्ये काँग्रेस व भाजपमध्ये आमने-सामने सत्तासंघर्ष होईल, असे चित्र स्पष्ट होत आहे. याशिवाय आठ सोसायट्यांची निवडणूक बिनविरोध होणार, हे स्पष्ट झाले आहे.कडेगाव तालुक्यातील २४ सहकारी संस्थांमध्ये एकंदरीत ७२४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. निवडणूक प्राधिकरणाने सोसायटीसाठी १३ संचालकांची संख्या निश्चित केली आहे. वांगी येथील विठ्ठलदेव सोसायटीसाठी सर्वाधिक ६३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. याशिवाय अंबक सोसायटीसाठी ५७, हनुमान चिंचणी ४६, कुंभारगाव ४५, सोनकिरे २७, वडियेरायबाग ३८, अमरापूर ३९, आसद ४३, शिवणी ३२, नेर्ली ४२, पाडळी ३१, देवराष्ट्रे ५0, उपाळे मायणी ११, सोनसळ १२, कडेपूर १५, हिंगणगाव खुर्द १३, कान्हरवाडी १३, विहापूर १३, सोहोली १३, शिरसगाव १३, असे ७२४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.सोनसळ सोसायटी मोहनराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध होत आहे, तर कडेपूर सोसायटी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध होत आहे. याशिवाय विहापूर, कान्हरवाडी, शिरसगाव, सोहोली, हिंगणगाव खुर्द, उपाळे मायणी या सोसायट्याही बिनविरोध होत आहेत. या आठही संस्था बिनविरोधची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. अन्य १६ सहकारी संस्थांत मात्र काँग्रेस व भाजपमध्ये आमने-सामने निवडणूक होणार हे स्पष्ट झाले आहे. काही संस्थांत मात्र काँग्रेसला गटबाजीचे ग्रहण लागले आहे. वांगी, देवराष्ट्रे आणि चिंचणी (वांगी) या तिन्ही संस्थांची निवडणूक लक्षवेधी ठरणार, असे चित्र आहे. (वार्ताहर)
ओळखपत्र अनिवार्य
सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान करणाऱ्या सभासदांना निवडणूक प्राधिकरणाने १७ प्रकारची ओळखपत्रे ग्राह्य मानली आहेत. यापैकी छायाचित्र असलेले किमान एक तरी ओळखपत्र मतदानावेळी दाखविणे अनिवार्य आहे.