नगरसेवक फोडाफोडीला काँग्रेस आघाडीकडून वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 03:24 PM2020-02-06T15:24:04+5:302020-02-06T15:25:05+5:30

सांगली महापालिकेच्या सत्तेची चावी हाती ठेवण्यासाठी सत्ताधारी भाजपची धावपळ सुरू असताना, आता विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीने नगरसेवक फोडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

Congress alliance speeds up corporator vandalism | नगरसेवक फोडाफोडीला काँग्रेस आघाडीकडून वेग

नगरसेवक फोडाफोडीला काँग्रेस आघाडीकडून वेग

Next
ठळक मुद्देनगरसेवक फोडाफोडीला काँग्रेस आघाडीकडून वेगमहापौर, उपमहापौर निवडीत भरला चांगलाच रंग

सांगली : महापालिकेच्या सत्तेची चावी हाती ठेवण्यासाठी सत्ताधारी भाजपची धावपळ सुरू असताना, आता विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीने नगरसेवक फोडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी सध्या भाजपमध्ये असलेले पूर्वाश्रमीच्या आघाडीच्या नेत्यांची मदत घेतली जात आहे. भाजपमधील नाराजांशी संपर्कही साधला जात असून, त्यांना विविध आमिषेही दाखविली जात आहेत. त्यामुळे महापौर, उपमहापौर निवडीत चांगलाच रंग भरला आहे.

महापौर, उपमहापौर पदासाठी शुक्रवारी निवडणूक होत आहे. सत्ताधारी भाजपने सर्वच नगरसेवकांना गोव्याच्या सहलीवर पाठविले आहे, तर काँग्रेस आघाडीचे नगरसेवक सांगली-मिरजेतच आहेत. भाजपकडे ४३, तर आघाडीकडे ३५ नगरसेवक आहेत.

महापौर, उपमहापौर पदावरून भाजपमध्ये नाराजी उफाळून आली आहे. त्याचाच फायदा उचलण्यासाठी विरोधी आघाडीने जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपचे नगरसेवक गोव्यात असले तरी, त्यातील काहींशी दूरध्वनीवरून संपर्कही साधला जात आहे. सत्ताधारी गटातील नगरसेवकांची फोडाफोडी करण्याच्या हालचालींना बुधवारी चांगलाच वेग आला होता.

विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्यासह काही प्रमुख नगरसेवकांनी भाजपचे सदस्य गळाला लावण्याची जबाबदारी उचलली आहे. त्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.

भाजपच्या दहा नगरसेवकांना निवडीवेळी गैरहजर ठेवण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. त्यामुळे भाजपचे संख्याबळ ३३ वर येईल आणि काँग्रेस व राष्ट्रवादीचा महापौर, उपमहापौर होईल, असे आडाखेही बांधले जात आहेत. पण दहा नगरसेवकांची जुळणी होणार का? यावर बरेच गणित अवलंबून आहे.

भाजपमध्ये निम्म्याहून अधिक नगरसेवक हे पूर्वाश्रमीचे काँग्रेस व राष्ट्रवादीचे आहेत. त्यापैकी काहीजणांशी संपर्कही झाला आहे. भविष्यात पक्षांतरबंदी कायद्यातून निर्माण होणाऱ्या अडचणी सोडविण्यासह पुढच्या निवडणुकीत उमेदवारीचा शब्द दिला आहे.

काहीजणांशी आर्थिक तडजोडही सुरू आहे. या साऱ्या घडामोडींवर भाजप नेत्यांचे लक्ष आहे. एकही नगरसेवक फुटणार नाही, यासाठी भाजपचे नेते सतर्क आहेत. फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आल्याने या निवडीत रंगत आली आहे.

Web Title: Congress alliance speeds up corporator vandalism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.