Sangli Crime: रागाने बघितल्याच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी, हरिपूर येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 15:37 IST2023-01-05T15:37:24+5:302023-01-05T15:37:58+5:30
दोन्ही कुटुंबांकडून सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्यादी दाखल

Sangli Crime: रागाने बघितल्याच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी, हरिपूर येथील घटना
सांगली : हरिपूर (ता. मिरज) येथे शिवीगाळ केल्याच्या व रागाने बघत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीतून दोन कुटुंबांमध्ये मारामारीचा प्रकार घडला. याप्रकरणी दोन्ही कुटुंबांकडून सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्यादी दाखल आहेत.
आकाश परशराम मोहिते (वय २३, रा. हरिपूर) याने शुभम संजय रोडे, सुरज उर्फ अक्षय संजय रोडे, शरद वसंत रोडे, प्रियांका सुरज रोडे, वैशाली संजय रोडे (सर्व रा. सरती गल्ली, हरिपूर) यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आकाश हा संशयितांकडे शिवीगाळ का करता, असे विचारण्यास गेला होता. त्याचा राग आल्याने संशयित शुभम संजय रोडे याने आकाश याला फरशी मारून जखमी केले. तसेच आकाशच्या घरी येत त्यांनी फिर्यादीची आई, वडील आणि बहीण यांना काठीने व वीट फेकून मारत जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
शुभम संजय रोडे याने आकाश परशराम मोहिते, संजय दशरथ मोहिते, शुभम विठ्ठल फाकडे, आदित्य दशरथ मोहिते, स्वाती संजय मोहिते, अपूर्वा शुभम फाकडे (सर्व रा. सरती गल्ली, हरिपूर) यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. शुभम हा जेवण करून मित्रांसोबत बोलत उभा असताना संशयित तिथे आले व त्यांनी ‘तू आमच्याकडे रागाने बघत का जातोस,’ असे म्हणत सळईने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
शुभमसह त्याच्या आईलाही संशयितांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीनुसार सर्व संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.