Sangli: करगणीत दोन मोटारींच्या धडकेत चिमुरड्याचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी
By संतोष भिसे | Updated: April 6, 2024 16:26 IST2024-04-06T16:25:24+5:302024-04-06T16:26:53+5:30
आटपाडी : भरधाव प्रवासी मोटारीने दुसऱ्या मोटारीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहा वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. अपघातात ...

Sangli: करगणीत दोन मोटारींच्या धडकेत चिमुरड्याचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी
आटपाडी : भरधाव प्रवासी मोटारीने दुसऱ्या मोटारीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहा वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. अपघातात एकाच कुटुंबातील पाचजण जखमी झाले. त्यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.
तौसिफ मुजावर (वय ६ वर्षे) याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. समीर असिम मुजावर (वय ३२), त्यांची पत्नी वहिदा (वय २४), शकिला शब्बीर मुलाणी (वय ४०), शाहीद मुजावर (वय ९ वर्षे) हे गंभीर जखमी झाले. तौसिफ याचे दोन्ही पाय अपघातात निकामी झाले होते. त्याला उपचारांसाठी सांगलीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याचा मृत्यू झाला. अन्य जखमींवर आटपाडीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
माळेवाडी (ता. आटपाडी) येथील मुजावर कुटुंबीय बुधवारी रात्री मोटारीतून (एमएच ०६ एफ ८३२९) नेलकरंजी येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रमानंतर रात्री घरी परतत होते. करगणी येथे जिल्हा बँकेसमोर रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांच्या गाडीला समोरून आलेल्या मोटारीने (एमएच ०९ एफव्ही ९०४५) जोराची धडक दिली. त्यामध्ये मोटारीत पुढील बाजुस बसलेल्या दोन मुलांसह वडीलांना गंभीर इजा झाली. एका बालकाच्या पायाचा चेंदामेंदा झाला. अपघातानंतर गाडी उलटली. सर्व प्रवासी जखमी झाले. या दुर्घटनेने माळेवाडी गावावर शोककळा पसरली. वहिदा मुजावर यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.