सांगली : कृष्णा नदीचेप्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने तयार केलेल्या ९३ कोटी रुपयांच्या प्रकल्पास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी हिरवा कंदील दर्शविला. प्रकल्पास तातडीने प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी केली. त्यानंतर फडणवीस यांनी याबाबत तातडीने निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली.नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेरीनाला शुद्धीकरण प्रकल्पाबाबत गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. शेरीनाल्यामुळे होणारे कृष्णेचे प्रदूषण रोखण्यासाठी नवीन मलशुद्धीकरण प्रस्तावास तातडीने प्रशासकीय मंजुरी द्यावी अशी मागणी केली. या प्रस्तावाबरोबरच सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील तसेच सांगली विधानसभा मतदारसंघातील काही प्रलंबित विषय आणि प्रस्तावांबाबतही चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सर्व मागण्यांबाबत शासन तातडीने कार्यवाही करील, असे आश्वासन दिले.आमदार गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कृष्णा नदीत शेरीनाल्याचे पाणी मिसळून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. ते रोखण्यासाठी धुळगाव योजना पूर्वी राबवण्यात आली होती. या योजनेतून शेरीनाल्यातील दूषित पाणी उचलून ते शुद्ध करून धुळगाव परिसरातील शेतीला दिले जाते. परंतु पावसाळ्यात किंवा जेव्हा पाण्याची गरज नसते तेव्हा या पाण्याला फारशी मागणी नसते. त्यावेळी हे अशुद्ध पाणी कृष्णा नदीच्या पात्रात मिसळून नदीचे पाणी प्रदूषित होते.यासाठीच शेरीनाल्यातील अशुद्ध पाणी शुद्ध करण्यासाठी विशेष मलशुद्धीकरण प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठीचा ९३ कोटी ५१ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करून शासनास सादर करण्यात आला आहे. त्या प्रस्तावास तातडीने प्रशासकीय मंजुरी आवश्यक आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रस्तावाच्या मंजुरीबाबत तातडीने कार्यवाही करू असे आमदार गाडगीळ यांना सांगितले.
विकास आराखड्याबाबतही चर्चामहापालिकेची अंतिम विकास योजना नकाशासह अन्य महत्त्वाच्या शासन स्तरावरील काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रस्तावांना मंजुरी मिळावी, अशीही मागणी आमदार गाडगीळ यांनी केली.