Sangli: चांदोली धरण गळतीचे काम बंद; किती टक्के झाले काम, कधी होणार पुर्ण.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 12:11 IST2024-12-25T12:10:33+5:302024-12-25T12:11:29+5:30
विकास शहा शिराळा : चांदोली धरणाच्या २०१४ च्या पावसाळ्यानंतरच्या अहवालातून १४३९.४८ लिटर प्रतिसेकंद गळती सुरू होती. ही गळती थांबविण्यासाठी ...

Sangli: चांदोली धरण गळतीचे काम बंद; किती टक्के झाले काम, कधी होणार पुर्ण.. जाणून घ्या
विकास शहा
शिराळा : चांदोली धरणाच्या २०१४ च्या पावसाळ्यानंतरच्या अहवालातून १४३९.४८ लिटर प्रतिसेकंद गळती सुरू होती. ही गळती थांबविण्यासाठी सुरू असलेले काम पंचावन्न टक्के पूर्ण झाले असून, यामुळेही आता डावा तीर ३२७.३० व उजवा तीर ११४ अशी एकूण ४४१.३० प्रतिसेकंद गळती आहे. धरण भरल्यामुळे सध्या हे काम बंद असून पाणीपातळी कमी होईल त्याप्रमाणे उर्वरित काम जून २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे.
वारणा धरणामध्ये १९८५ पासून अंशतः तर २००२ पासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा केला. १९९२ च्या पावसाळी हंगामापासून दगडी धरणातून होणाऱ्या गळतीची मोजणी करण्यात येत आहे. अधीक्षक अभियंता, धरण सुरक्षा संघटना, नाशिक यांचे २०१४ च्या पावसाळ्यानंतरच्या धरण पाहणी अहवालानुसार दगडी धरणाच्या डाव्या बाजूस ७३७.२० व उजव्या बाजूस ७०२.२८ असे एकूण १४३९.४८ लिटर प्रतिसेकंद गळती आढळून आली होती. त्यामुळे गळती प्रतिबंधक उपाययोजनेचे काम करणे आवश्यक असल्याचे नमूद केले होते.
मार्च २०१९ मध्ये अणू घनता नोंद व भूकंपीय टोमोग्राफीबाबतच्या अभ्यासाच्या अनुषंगाने धरण गळती प्रतिबंधक योजनेच्या अंदाजपत्रकीय किंमत ५०.०१ कोटी रुपये होती. यास दि. २७ जानेवारी २०२२ रोजी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. या कामास वर्ष २०२४-२५ साठी ३० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यापैकी आजअखेर ५५ टक्के काम पूर्ण झाले असून, नोव्हेंबर २०२४ अखेर या कामावर ३१.३५ कोटी रुपये इतका खर्च झाला आहे. गळती रोखण्याचे काम जून २०२५ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
वारणा दगडी धरण गळती प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे काम प्रगतिपथावर असून, सद्य:स्थितीत सदरचे काम भौतिकदृष्ट्या ५५ टक्के इतके पूर्ण झाले आहे. या धरणातून सिंचनासाठी नियमित पाणी लाभधारक शेतकरी यांच्या शेतीसाठी सोडले जाते. त्यामुळे धरणातील पाणीपातळी जशी जशी कमी होईल त्याप्रमाणे उर्वरित कामे जून २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. - डी. डी. शिंदे, कार्यकारी अभियंता, वारणा कालवे विभाग, इस्लामपूर.