रावळगुंडवाडीत चंदन जप्त

By Admin | Updated: September 19, 2015 23:58 IST2015-09-19T23:54:41+5:302015-09-19T23:58:37+5:30

पोलिसांचा छापा : दोन लाखांचा साठा हस्तगत; बाप-लेकावर गुन्हा

Chandan seized in Ravalgundwadi | रावळगुंडवाडीत चंदन जप्त

रावळगुंडवाडीत चंदन जप्त

संख : रावळगुंडवाडी (ता. जत) येथे जत पोलिसांनी छापा टाकून २ लाख १० हजार रुपयांचा चंदनाचा साठा जप्त केला. याप्रकरणी लक्ष्मण रामाण्णा माने (वय ६०), यल्लाप्पा लक्ष्मण माने (रा. रावळगुंडवाडी) या बाप- लेकाविरुद्ध जत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हा साठा डाळिंबाच्या बागेत करण्यात आला होता. या घटनेतील यल्लाप्पा लक्ष्मण माने हा फरारी आहे. ही कारवाई दुपारी २ च्या दरम्यान झाली. या मोहिमेमुळे चंदन तस्करांमध्ये घबराट पसरली आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी, पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने रावळगुंडवाडी येथे छापा टाकला. लक्ष्मण माने यांच्या शेतामध्ये डाळिंबाच्या बागेत चंदनाचे लहान-मोठे तुकडे प्लॅस्टिक पोत्यात ठेवण्यात आले होते. तुकड्यांचे वजन ७० किलो होते. बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत २ लाख १० हजार रुपये आहे.
खबऱ्यामार्फत चंदन तस्कराची माहिती मिळाली होती. पोलिसांनी धडक मोहीम राबवून ही कारवाई केली. पथकामध्ये उपनिरीक्षक आर. आय. शेख, पोलीस नाईक मोहिते, घाडगे, माने, गंभीर, खोत यांनी सहभाग घेतला होता. अधिक तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Chandan seized in Ravalgundwadi