सांगली जिल्हा परिषदेत ‘आओ जावो, घर तुम्हारा’ चालणार नाही!; सीईओंनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना ठणकावले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 15:35 IST2025-09-10T15:34:01+5:302025-09-10T15:35:40+5:30

मंगळवारीही नऊ जण लेट सापडले

CEO takes action against officers and employees who do not arrive on time at Sangli Zilla Parishad | सांगली जिल्हा परिषदेत ‘आओ जावो, घर तुम्हारा’ चालणार नाही!; सीईओंनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना ठणकावले 

सांगली जिल्हा परिषदेत ‘आओ जावो, घर तुम्हारा’ चालणार नाही!; सीईओंनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना ठणकावले 

सांगली : जिल्हा परिषदेत ‘आवो जाओ घर तुम्हारा’ या वृत्तीने वागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी दिला आहे. काही अधिकारी व कर्मचारी प्रशासकीय शिस्त पाळत नसल्याचे निदर्शनास आल्याने कारवाईची पावले उचलली जात आहेत.

अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी नरवाडे यांनी परिपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा दिला आहे. परिपत्रकात कामकाजाची वेळ, भोजनाची वेळ याची आठवण करून दिली आहे. क्षेत्रभेटीवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सकाळी आणि सायंकाळी कार्यालयीन वेळेत संबंधित कामाच्या ठिकाणाहून जिओ टॅगिंग केलेले फोटो पाठवण्याची सूचना केली आहे.

अधिकारी व गट क मधील कर्मचाऱ्यांची कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ आहे. गट ड कर्मचाऱ्यांची वेळ सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० आहे. भोजनाची वेळ दुपारी १ ते २ या वेळेत अर्धा तास म्हणजेच १.३० ते २.०० अशी निर्धारित केली आहे.

हे आदेश सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना बंधनकारक आहेत. बायोमेट्रिक प्रणाली नसलेल्या ठिकाणी ती त्वरित कार्यान्वित करण्याचे आदेश नरवाडे यांनी दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. पहिल्यांदा लेखी सूचना व समज, दुसऱ्यांदा एका दिवसाची वेतनकपात आणि तिसऱ्यांदा शिस्तभंगविषयक कारवाई केली जाणार आहे. वार्षिक गोपनीय अहवालातही नोंद घेण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

मंगळवारीही नऊ जण लेट

दरम्यान, कर्मचाऱ्यांचा निवांतपणा अजूनही संपलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी सलग पाचव्या दिवशी ९ कर्मचारी लेट झाले. त्यांना नोटिसा देण्यात येणार आहेत. सोमवारी २२ कर्मचारी उशिरा आले होते. मंगळवारी नऊ जण सापडले. यामध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील तिघे, प्राथमिक शिक्षण विभागातील दोघे, बांधकाम विभागातील तीन आणि पशुसंवर्धन विभागातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांना शिस्त लागेपर्यंत ही मोहीम सुरूच राहण्याची चिन्हे आहेत.

Web Title: CEO takes action against officers and employees who do not arrive on time at Sangli Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.