सांगलीत ‘डीजे’चा दणदणाट करणाऱ्यांवर गुन्हा दाखल, साऊंड सिस्टीम जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 18:56 IST2025-08-12T18:56:24+5:302025-08-12T18:56:45+5:30
पहिल्या कारवाईने इतरांना इशारा

संग्रहित छाया
सांगली : जुना कुपवाड रस्त्यावरील गजानन कॉलनीत भर दुपारी ‘डीजे’ चा कर्णकर्कश्श आवाज सोडून नागरिकांची झोपमोड करणाऱ्या विष्णू बाबूराव देवकते (वय ४०, रा. गजानन कॉलनी) याच्यावर संजयनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच त्याच्याकडील दोन सब प्लस टॉप स्पीकर, ॲम्प्लिफायर असा १ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विष्णू देवकते याचा साऊंड सिस्टीम भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. त्याच्याकडे भाड्याने साऊंड सिस्टीम मागायला येणारे त्याला वाजवून दाखवण्यास सांगतात. त्यामुळे नागरी वस्तीत तो कानठळ्या बसवणारा आवाज सोडून दाखवतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतत त्रास होतो. रविवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास देखील त्याने साऊंड सिस्टीमचा दणदणाट सुरू केला.
काहींना त्रास होऊ लागला. त्यामुळे सजग नागरिकांनी डायल ११२ वर कॉल करून तक्रार केली. तक्रारीनुसार संजयनगर पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी काहीशा उशिराने घटनास्थळी येऊन साऊंड सिस्टीम जप्त केली.
पोलिस कर्मचारी शशिकांत भोसले यांनी विष्णू देवकते याच्याविरुद्ध फिर्याद दिली. सध्या जिल्हाधिकारी यांचा बंदी आदेश १६ ऑगस्टपर्यंत लागू आहे. त्यानुसार वाद्य वाजवण्यास बंदी आदेश लागू आहे. तरीही देवकते याने सार्वजनिक रस्त्यावर वाद्य वाजवून बंदी आदेशाचा भंग केल्याबद्दल तसेच पोलिस अधिनियम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या कारवाईने इतरांना इशारा
आगामी उत्सव काळात डीजेचा दणदणाट करणाऱ्यांना पोलिसांनी बैठक घेऊन इशारा दिला आहे. तर संजयनगर पोलिसांनी पहिली कारवाई केल्यामुळे हा इतरांना एकप्रकारे इशाराच मानला जात आहे.