अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या पोर्टलवर ‘बिझनेस प्रमोशन’ टॅब; उत्पादन-सेवांची माहिती थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 16:20 IST2026-02-05T16:19:55+5:302026-02-05T16:20:57+5:30
लाभार्थ्यांच्या व्यवसायाला नवे बळ

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या पोर्टलवर ‘बिझनेस प्रमोशन’ टॅब; उत्पादन-सेवांची माहिती थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणार
प्रसाद माळी
सांगली : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी व त्यांच्या व्यवसायाचे मार्केटिंग करण्यासाठी महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटवरती बिझनेस प्रमोशन हा नवा स्वतंत्र टॅब उपलब्ध करून दिला आहे. या नव्या टॅबच्या माध्यमातून लाभार्थी व्यावसायिक, उद्योजक त्यांचे सेवा, उत्पादने त्यांची किंमत, तसेच वैशिष्ट्य यांसह व्यवसायाशी संबंधित सविस्तर माहिती पोर्टलवर अपलोड करू शकणार आहेत. याद्वारे लाभार्थ्यांच्या व्यवसायाची प्रसिद्धीसह ग्राहकांपर्यंत पोहचणे सुलभ होणार आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अधिकृत www.udyog.mahaswayam.gov.in या पोर्टलवर Business Promotion (व्यवसाय वृद्धी) हा स्वतंत्र टॅब उपलब्ध करून दिला आहे. या सुविधेमुळे लाभार्थ्यांच्या व्यवसायाला व्यापक प्रचार व प्रसिद्धी मिळणार असून, त्यांची उत्पादने व सेवा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. उपक्रमामुळे लाभार्थ्यांच्या व्यवसायाचा विस्तार होण्यास चालना मिळेल, स्थानिक उत्पादने व सेवा ग्राहकांना सहज उपलब्ध होतील, तसेच महामंडळाच्या लाभार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना राज्य शासन उद्योग, व्यवसायासाठी अर्थसाहाय्य करते. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजनेच्या माध्यमातून बँकांकडून कर्ज उपलब्ध केले जाते. योजनेचे लाभार्थी बँकेला मंजूर कर्ज व त्याचे व्याज हप्ते स्वरूपात भरतात. त्यानंतर लाभार्थी महामंडळाकडे भरलेल्या व्याजेच्या रकमेची मागणी करतात. मागणीनंतर संबंधित लाभार्थी जितके व्याज बँकेत भरतात तितक्या व्याजाचा परतावा महामंडळाकडून त्यांना अनुदान स्वरूपात परत केला जातो. या योजनेच्या माध्यमातून हजारो तरुण आज सक्षम झाले आहेत.
महामंडळाने फेब्रुवारी २०१८ ते एप्रिल २०२४ या सात वर्षांत केलेले अर्थसाहाय्य
- वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
- एकूण बॅंक कर्ज मंजूर लाभार्थी : ९६९७
- बँकेने वितरित केलेले एकूण कर्ज रक्कम : ९७१ कोटी १२ लाख २० हजार ८८९
- व्याज परतावा मंजूर झालेली लाभार्थी संख्या : ९४८२
- व्याज परतावा मिळालेली लाभार्थी संख्या : ८८८५
- महामंडळाने केलेला व्याज परतावा : १०६ कोटी ४७ लाख ५३ हजार ८५६
- २. गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना
- अर्ज केलेल्या गटाची संख्या : ४३६
- एकूण बॅंक कर्ज मंजूर लाभार्थी गटांची संख्या : २३४
- व्याज परतावा मिळालेली लाभार्थी गट संख्या : २१८
- महामंडळाने केलेला व्याज परतावा : ७ कोटी ३० लाख
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या सर्व संबंधित लाभार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपली आवश्यक माहिती तत्काळ पोर्टलवर अपलोड करावी. याबाबत कोणतीही अडचण अथवा मार्गदर्शनासाठी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा. - निशा पाटील, जिल्हा समन्वयक, अण्णासाहेब पाटील महामंडळ.