Sangli News: बेडग येथे सख्ख्या भावांचा तलावात बुडून मृत्यू, रमजान महिन्यातच सनदी कुटुंबावर दु:खाचा डोंगर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 18:20 IST2023-03-25T18:18:29+5:302023-03-25T18:20:25+5:30
तलावात दोघा भावांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी

Sangli News: बेडग येथे सख्ख्या भावांचा तलावात बुडून मृत्यू, रमजान महिन्यातच सनदी कुटुंबावर दु:खाचा डोंगर
सदानंद औंधे
मिरज : बेडग ता. मिरज येथे नागरगोजेवाडीत पोहायला तलावात गेलेल्या दोन बालकांचा तलावात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. अयाज युनुस सनदी (वय ९) व अफान युनुस सनदी (वय ७) अशी मृत मुलांची नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बेडग गावातील टेम्पोचालक युनूस नसरुद्दीन सनदी आपल्या कुटुंबियासोबत राहतात. त्यांना दोन मुले आहेत. तिसरीत शिकणारा अयाज व पहिलीत शिकणारा अफान हे दोघे दुपारी शाळेतून परिक्षा देऊन आल्यानंतर मासे पकडण्यासाठी सार्वजनिक पाझर तलावात गेले होते. यावेळी दोघेही पोहण्यासाठी तलावात उतरले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाले.
मुलांचा आरडाओरडा ऐकून तेथे आलेल्या शाहिद मुजावर याने दोघांना तलावातून बाहेर काढले. मात्र, अयाज व अफान यांचा बुडाल्याने मृत्यू झाला. तलावात दोघा भावांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. रमजान महिन्यात नागरगोजेवाडी येथील सनदी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळल्याने पालकांचा आक्रोश सुरु होता. या घटनेने नागरगोजेवाडी येथे शोककळा पसरली होती.