Sangli News: कुसळेवाडीत कालव्यावरचा पूल कोसळला, रहदारी ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 18:25 IST2023-02-16T18:24:58+5:302023-02-16T18:25:26+5:30
गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने पत्रव्यवहार करूनही घेतली नाही दखल

Sangli News: कुसळेवाडीत कालव्यावरचा पूल कोसळला, रहदारी ठप्प
मलकापूर : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील कुसळेवाडी येथील वारणा डाव्या कालव्यावरील पूल बुधवारी सकाळी कोसळला. पूल कोसळल्याने पुलापलीकडील मस्कर गल्लीचा व शेतकऱ्यांचा संपर्क तुटला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ग्रामस्थांमधून प्रशासनाच्या विरोधात संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
कुसळेवाडी हे जवळपास एक हजार लोकवस्तीचे गाव आहे. गावाजवळून बारमाही वाहणारा वारणा डावा कालवा गेला आहे. गावची नव्वद टक्के शेतजमीन तसेच दहा कुटुंब पुलाच्या पलीकडे राहत असल्यामुळे या पुलावरून दिवस - रात्र वर्दळ सुरू असते. याबाबतीत कुसळेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीकृष्ण कुसळे, उपसरपंच वसंत नाईक तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी प्रशासनास पत्रव्यवहार केला.
गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने पत्रव्यवहार करूनही त्याची दखल घेण्याऐवजी याबाबतच्या पत्रव्यवहारास संबंधित प्रशासनाने केराची टोपली दाखविली. अखेर त्याचे पर्यवासन हा पूल कोसळण्यात झाले.