सांगलीत लाचखोर सरकारी वकिलास पाठलाग करून पकडले, खटला निकाली काढण्यासाठी घेतली लाच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 11:47 AM2023-12-12T11:47:16+5:302023-12-12T11:47:42+5:30

सहायक सरकारी वकिलास लाचप्रकरणी अटक करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ

Bribery government lawye arrested in Sangli, A bribe was taken to settle the case | सांगलीत लाचखोर सरकारी वकिलास पाठलाग करून पकडले, खटला निकाली काढण्यासाठी घेतली लाच

सांगलीत लाचखोर सरकारी वकिलास पाठलाग करून पकडले, खटला निकाली काढण्यासाठी घेतली लाच

सांगली : न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यात तडजोड घडवून तो लवकर निकाली काढण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर दुचाकीवरून निघालेला सहायक सरकारी अभियोक्ता ॲड. सोमनाथ काकासो माळी (वय ३६, रा. गणेश कॉलनी, सुभाषनगर, मिरज) याला पाठलाग करून रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहिती अशी, ॲड. माळी हा सांगलीत प्रथमवर्ग न्यायालयात सहायक सरकारी अभियोक्ता म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार यांच्याविरोधातील खटला न्यायालयात दाखल आहे. या खटल्यात तडजोड घडवून तो लवकर निकाली काढण्यासाठी ॲड. माळी याने तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबतची तक्रारदार याने शुक्रवार, दि. ८ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवार, दि. ११ रोजी तक्रारीची पडताळणी केली. त्यामध्ये ॲड. माळी याने तक्रारदाराकडे खटला निकाली काढण्यासाठी २५ हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती २० हजार लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर विजयनगर येथे जिल्हा न्यायालयाबाहेर सापळा लावला होता. त्यावेळी ॲड. माळी याने विजयनगर रस्त्यावर दुचाकीवरच तक्रारदाराकडे लाचेची मागणी करून २० हजारांची लाच स्वीकारली. 

रक्कम स्वीकारल्यानंतर तो दुचाकीवरून थेट दुसऱ्या कामासाठी निघाला. त्यामुळे पथकाने त्याचा पाठलाग सुरू केला. दुचाकीवरून नेमिनाथनगर येथे श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील हायस्कूल येथे आल्यानंतर त्याला पथकाने रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. त्यानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात आणून गुन्हा दाखल करून अटक केली. त्याला मंगळवारी विशेष न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील, पोलिस निरीक्षक विनायक भिलारे आणि दत्तात्रय पुजारी, पोलिस अंमलदार प्रीतम चौगुले, धनंजय खाडे, अजित पाटील, सलीम मकानदार, रामहरी वाघमोडे, ऋषिकेश बडणीकर, उमेश जाधव, सुदर्शन पाटील, सीमा माने आदींनी कारवाईत सहभाग घेतला.

पहिलीच कारवाई

सहायक सरकारी वकिलास लाचप्रकरणी अटक करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ असल्याचे चौकशीत पुढे आले. त्यामुळे या कारवाईची वकील वर्गासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Web Title: Bribery government lawye arrested in Sangli, A bribe was taken to settle the case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.