गुंडाचा पाठलाग करून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 12:00 AM2018-10-04T00:00:17+5:302018-10-04T00:00:22+5:30

The blood chased by the gang | गुंडाचा पाठलाग करून खून

गुंडाचा पाठलाग करून खून

Next

सांगली : खून आणि इतर गंभीर गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार सनी दरिकांत कांबळे (वय ३५, रा. दडगे प्लॉट, आयटीआय-जवळ, संजयनगर, सांगली) याचा पाठलाग करून कुकरीने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास कॉलेज कॉर्नर येथील हॉटेल अक्षरमजवळ हा हल्ला करण्यात आला. पोलिसांनी चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
खुनासह इतर गंभीर गुन्ह्यातील सहभागामुळे सनी कांबळे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तो मोपेडवरून (एमएच १० डीए १३८३) हॉटेल अक्षरमजवळ आला होता. त्यानंतर तो हॉटेलसमोरच्या कमी रहदारीच्या रस्त्यावरून चालला होता. त्यावेळी अचानक दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याला अडवत त्याच्यावर कुकरीने हल्ला केला. त्याला काही कळायच्या आतच हल्लेखोरांनी सपासप वार केले. पहिला वार डोक्यात झाल्यानंतर सनी कांबळेने बचावासाठी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, थोड्याच अंतरावर जाऊन तो कोसळल्याने हल्लेखोरांनी पुन्हा त्याच्यावर वार केले. तो निपचित पडल्यानंतर हल्लेखोरांनी कुकरी तेथेच टाकून पलायन केले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी कांबळे यास उपचारासाठी रिक्षातून शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, हल्लेखोर तीन ते चार असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. त्यांच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहेत. सायंकाळी चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
अप्पर जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे, पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील, सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे आदींनी घटनास्थळी भेट दिली. श्वानपथक व फॉरेन्सिक लॅबच्या पथकानेही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

श्वान परिसरातच घुटमळले
घटनेनंतर तात्काळ श्वानपथकास घटनास्थळी पाचारण करण्यात आले. श्वानास तेथे पडलेल्या हत्याराचा वास देण्यात आल्यानंतर श्वानाने आॅटो इंडियाच्या मागील रस्त्यावरून सर्किट हाऊसपर्यंतचा माग दाखविला व त्या परिसरातच ते घुटमळले. त्यानंतर पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत हल्लेखोरांच्या शोधासाठी मोहीम राबविली.

बघ्यांची मोठी गर्दी
नेहमीच गजबज असलेल्या कॉलेज कॉर्नर चौकापासून अगदी जवळच ही घटना घडल्याने बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. कॉलेज कॉर्नरकडून रतनशीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर व दुर्गामाता मंदिराजवळून मागे जाणाºया मार्गावर नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांना वारंवार गर्दी हटवावी लागत होती.

गुंड सनी कांबळे याच्यावर अनेक गुन्हे
३० एप्रिल २०१६ ला कलानगर येथील रेल्वे पुलाजवळ झालेल्या गुंड रवी मानेच्या खून प्रकरणात सनी कांबळेचा सहभाग होता. जानेवारी २०१२ मध्ये झालेल्या घाटनांद्रे (ता. कवठेमहांकाळ) येथील सुभाष झांबरे यांच्या खून प्रकरणातही त्याचा सहभाग होता. परंतु पुराव्याअभावी कांबळेसह इतर संशयितांची निर्दोेष सुटका झाली होती. २०१३ मध्ये त्याच्यावर हद्दपारीची कारवाई झाली होती. मारामारीसह इतर गंभीर गुन्ह्यांतही त्याचा सहभाग होता. अलीकडे मात्र गुन्हेगारी कारवायांमध्ये त्याचा सहभाग कमी होता.

Web Title: The blood chased by the gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.