सांगली : जिल्ह्यातील सहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपने आटपाडी, जत पालिका खेचून आणल्या. शिंदेसेनेने विटा, शिराळा पालिकांवर भगवा फडवून जोरदार मुसंडी मारली. परस्परविरोधात लढले, तरीही महायुतीचे बाहुबल वाढले, असे चित्र जिल्ह्यात दिसून आले. पन्नास टक्के जागांवर दोन्ही पक्षांनी झेंडा फडकविला.आमदार जयंत पाटील यांनी उरुण-इस्लामपूर, आष्टा पालिकांत ऐतिहासिक विजय मिळविला. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी पलूस नगरपरिषद राखली, पण जत पालिकेत काँग्रेसचा मोठा पराभव झाला. माजी खासदार संजय पाटील यांनी स्वतंत्र आघाडीच्या माध्यमातून गड राखला.जिल्ह्यातील आठ पालिकांच्या नगराध्यक्षपदासाठी ४१ उमेदवार, तर १८१ नगरसेवक पदासाठी ५९४ उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांसाठी झालेल्या मतांची मोजणी रविवारी सकाळी १० वाजता सुरू झाली. दोन तासांत, म्हणजे दुपारी १२ वाजता, बहुतांश पालिकांतील निकाल जाहीर झाले. मतमोजणी केंद्राबाहेर विजय उमेदवार समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.भाजपने सर्वाधिक पाच पालिकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी उमेदवार उभे केले होते. उरुण-इस्लामपूर आणि विटा, पलूसमध्ये त्यांचा पराभव झालातर, जत, आटपाडी पालिकांमध्ये यश मिळाले. जिल्ह्यात भाजपचे नगरसेवक पदाचे सर्वाधिक ३५ उमेदवार विजयी झाले. शिंदेसेनेने मुसंडी मारत ३४ नगरसेवक आणि विटा, शिराळा नगराध्यक्षपदावर नाव कोरले. शिंदेसेना जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने नगरसेवकपदाच्या ३३ जागा जिंकत तिसऱ्या क्रमांकाचा मान पटकावला. आमदार जयंत पाटील आणि वैभव शिंदे यांनी आष्ट्याची सत्ता ताब्यात ठेवली.आमदार गोपीचंद पडळकर यांनी सर्वपक्षीय विरोधानंतरही जतमध्ये सत्तांतर केले. आटपाडीतही अमरसिंह देशमुख यांच्या मदतीने पहिला नगराध्यक्ष भाजपचा झाला. या ठिकाणी शिंदेसेनेला पराभवाचा धक्का बसला.
आठ नगरपालिका, नगरपंचायतीत पक्षीय बलाबल- भाजप : ३५- राष्ट्रवादी अजित पवार गट : १६- राष्ट्रवादी शरद पवार पक्ष : ३३- काँग्रेस : २३- शिंदेसेना : ३४- उद्धवसेना : ०- आष्टा शहर विकास आघाडी : २३- स्वाभिमानी विकास आघाडी : १३- तीर्थक्षेत्र विकास आघाडी : १- अपक्ष : ३एकूण : १८१
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा स्ट्राईक रेट सर्वाधिकजिल्ह्यातील १८१ जागांपैकी भाजपने सर्वाधिक १४१ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी ३५ जागी विजय मिळविला. शिंदेसेनेने ७७ जागा लढवून ३४ ठिकाणी विजय मिळविला. राष्ट्रवादीने १०३ जागा लढवत १६ जागांवर यश मिळविले. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने ५३ जागा लढविल्या असून, ३३ जागांवर विजय मिळविला. काँग्रेसने केवळ ४२ जागा लढवून २३ जागा जिंकल्या. उद्धवसेनेने नऊ जागांवर उमेदवार उभे करून खातेही उघडले नाही. सर्व पक्षात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा स्ट्राईक रेट अधिक राहिला.
कोणत्या पक्षाला किती ठिकाणी थेट नगराध्यक्षपद?
- भाजप : आटपाडी, जत
- शिंदेसेना : विटा, शिराळा
- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष : उरुण-इस्लामपूर
- स्वाभिमानी विकास आघाडी : तासगाव
- आष्टा शहर विकास आघाडी : आष्टा
- काँग्रेस : पलूस
विजयी नगराध्यक्ष
- ईश्वरपूर : आनंदराव संभाजी मलगुंडे (राष्ट्रवादी शरद पवार पक्ष)
- आष्टा : विशाल विलासराव शिंदे (आष्टा शहर विकास आघाडी)
- पलूस : संजीवनी सुहास पुदाले (काँग्रेस)
- विटा : काजल संजय म्हेत्रे (शिंदेसेना)
- जत : डॉ. रवींद्र शिवशंकर आरळी (भाजप)
- आटपाडी : यु. टी. जाधव (भाजप)
- तासगाव : विजया बाबासाहेब पाटील (स्वाभिमानी आघाडी)
- शिराळा : पृथ्वीसिंग भगतसिंग नाईक (शिंदेसेना)