युरियाचे लाडू वापरुन पक्ष्यांची शिकार, सांगलीतील आरगमध्ये समोर आला प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 18:12 IST2025-04-05T18:11:26+5:302025-04-05T18:12:10+5:30
शेतकऱ्याच्या सतर्कतेने पक्षी बचावले

संग्रहित छाया
बेडग : युरियाचे प्राणघातक लाडू वापरुन चित्तर पक्ष्यांच्या शिकारीचा प्रयत्न आरग (ता. मिरज) येथे झाला. एका शेतकऱ्याच्या सतर्कतेने पक्ष्यांचे प्राण वाचले.
शिपूर रस्त्यावरील एका शेताजवळ काही शिकाऱ्यांनी युरियाचे लाडू ठिकठिकाणी टाकले होते. त्यामध्ये काही धान्याचे दाणे मिसळले होते. शिवाय लाडूमध्ये नॉयलॉनच्या दोऱ्यांची जाळीही होती. दाणे टिपण्याच्या आशेने आलेले चित्तर पक्षी युरियामिश्रित लाडू खाऊन मरण पावतात, किंवा जाळ्यामध्ये अडकून पडतात. सायंकाळी शिकारी त्यांना ताब्यात घेतात. यापूर्वी काहीवेळा असे प्रकार परिसरात झाले आहेत.
दोन दिवसांपूर्वीही असेच काही लाडू ठिकठिकाणी टाकले होते. हे लक्षात येताच संबंधित शेतकऱ्याने ते नष्ट केले. यामुळे पक्ष्यांचे प्राण वाचले. यादरम्यान, जवळच एका मेंढपाळाच्या शेळ्या-मेंढ्याही शेतात खतासाठी बसल्या होत्या. त्यांनी धान्याच्या आशेने लाडू खाल्ले असते, तर त्यांनाही जीव गमवावा लागला असता. कळपातील २२ पिलांचाही जीव वाचला. अन्यथा मेंढपाळाची मोठी आर्थिक हानी झाली असती.
यापूर्वीही असेच कृत्य करणाऱ्या शिकाऱ्यांना शेतात कामाला आलेल्या एका शेतमजूर महिलेने रंगेहाथ पकडले होते. त्यावेळी शिकाऱ्यांनी तिला व तिच्या दोन मुलांना शस्त्राचा धाक दाखवून ते पसार झाले होते. त्यानंतर पुन्हा युरियाचे लाडून दिसून आले.