Sangli News: पंचायत समित्यांतही लवकरच बायोमेट्रिक हजेरी; अधिकाऱ्यांनीही सक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 13:34 IST2025-11-07T13:34:30+5:302025-11-07T13:34:46+5:30
जिल्हा परिषदेत चारदा हजेरी घेणार

Sangli News: पंचायत समित्यांतही लवकरच बायोमेट्रिक हजेरी; अधिकाऱ्यांनीही सक्ती
सांगली : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक प्रणाली लागू केली. पुढील टप्प्यात सर्व पंचायत समित्यांसाठीही ती लागू केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांनी कार्यालयात वेळेत हजर राहावे आणि लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती नरवाडे यांनी दिली.
सध्या जिल्हा परिषदेत एकूण चार बायोमेट्रिक उपकरणे बसविली आहेत. कर्मचाऱ्यांना सकाळी आणि सायंकाळी त्यावर हजेरी नोंदविणे बंधनकारक आहे. नरवाडे यांनी कार्यभार सांभाळला, तेव्हा अनेक कर्मचाऱ्यांची हजेरी `आओ जाओ घर तुम्हारा` अशीच होती. त्यावर नियंत्रणासाठी नरवाडे यांनी महिनाभर मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवण्याची कारवाई केली. सकाळी कार्यालयाची वेळ पावणेदहा आणि सायंकाळी सुटीची वेळ सव्वासहा वाजताची आहे. पण, अनेकजण अकरा वाजले तरी कार्यालयात नसायचे. सायंकाळी पाच-साडेपाचपासूनच गायब असायचे. सीईओंच्या गेट बंद मोहिमेत अनेकजण सापडले. त्यांच्यावर कारवायादेखील झाल्या. त्यानंतरच्या पुढील टप्प्यात बायोमेट्रिक प्रणाली लागू करण्यात आली.
या प्रणालीवर स्वत: नरवाडे यांचे लक्ष असून, उशिरा येणाऱ्यांची नोंद घेतली जात आहे. त्यांच्यावर कारवाईचे संकेत नरवाडे यांनी दिले आहेत. आता पुढील टप्प्यात सर्व १० पंचायत समित्यांत प्रणाली बसविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनाही हजेरी सक्तीची
प्रथमवर्ग अधिकाऱ्यांना हजेरी सक्तीची नाही असे प्रशासकीय संकेत आहेत, पण नरवाडे यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही बायोमेट्रिक हजेरी नोंदविण्याचे आदेश दिले आहेत. त्याची सुरुवात स्वत:पासूनच केली आहे. या सर्व प्रणालीचे नियंत्रण सामान्य प्रशासन विभागाकडे आहे.
दिवसभरात चारदा हजेरी घेणार
नरवाडे यांनी सांगितले की, ‘जिल्हा परिषदेत सध्या दोनवेळा हजेरी होते. लवकरच ती चारवेळा घेतली जाईल. अनेकजण दुपारी जेवणासाठी बाहेर पडल्यानंतर वेळेत परतत नाहीत. जिल्हाभरातून आलेल्या लोकांची गैरसोय होते. त्यामुळे आता जेवणासाठी जाताना व परतल्यावर हजेरी नोंदवावी लागेल. दुपारी एक ते दोन या तासाभरात केव्हाही अर्ध्या तासाचा वेळ कर्मचाऱ्यांनी जेवणासाठी घेणे अपेक्षित आहे.
काम करा, जादा वेळ थांबावे लागणार नाही
बायोमेट्रिकच्या सक्तीविषयी अनेक कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. “सकाळी वेळेत येण्याबद्दल आग्रही असणाऱ्या वरिष्ठांनी आम्ही सायंकाळी उशिरापर्यंत थांबून राहतो हेदेखील लक्षात घ्यावे’ अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यावर नरवाडे यांनी स्पष्टीकरण दिले की, ‘दिवसभरात कार्यालयीन वेळेत पूर्ण क्षमतेने काम केल्यास कर्मचाऱ्यांना जादा वेळ थांबावेच लागणार नाही’.