राज ठाकरेंना दिलासा! इस्लामपूर कोर्टाकडून अटक वॉरंट रद्द; व्हिसीद्वारे हजर राहण्याचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 16:39 IST2022-06-17T16:34:54+5:302022-06-17T16:39:03+5:30
Raj Thackeray: राज ठाकरेंचे अटक वॉरंट रद्द न करण्याच्या शिराळा कोर्टाच्या निर्णयाला इस्लामपूर सेशन कोर्टात आव्हान देण्यात आले होते.

राज ठाकरेंना दिलासा! इस्लामपूर कोर्टाकडून अटक वॉरंट रद्द; व्हिसीद्वारे हजर राहण्याचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर: कोकरूड पोलीस ठाण्यात १४ वर्षांपूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या खटल्याच्या कामकाजात मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावरील अटक वॉरंट रद्द करण्याचा निकाल येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या दुसऱ्या जिल्हा न्यायाधीश राजश्री परदेशी यांनी दिला. मात्र, शिराळा न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या कामकाजात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर राहण्याचे निर्देश राज ठाकरे यांना दिले आहेत.
शिराळा न्यायालयाने राज ठाकरे यांच्यावर अटक वॉरंट बजावले होते. मात्र, ठाकरे यांच्या वकिलांनी सुनावणीवेळी ते हजर राहू शकत नाहीत. त्यांच्या गैरहजेरीत अटक वॉरंट रद्द करावे, असा अर्ज दिला होता. हा अर्ज शिराळा न्यायालयाने फेटाळला होता. शिराळा न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देणारा अर्ज ठाकरे यांच्यावतीने इस्लामपूरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला होता. त्यावर न्या. परदेशी यांच्यासमोर तीन दिवसांपूर्वी सुनावणी झाली होती. राज ठाकरे यांचे वकील विजय खरात आणि आनंदा चव्हाण यांनी आपल्या युक्तिवादात राज ठाकरे यांना सुरक्षा व्यवस्था आहे. त्यांच्या दौऱ्याचा शासकीय यंत्रणेवर ताण पडतो. तसेच त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करावयाची असल्याने त्यांच्यावरील अटक वॉरंट रद्द करण्यात येऊन जामीन मंजूर करावा, अशी मागणी केली होती.
दरम्यान, न्या. परदेशी यांनी ठाकरे यांच्यावरील अटक वॉरंट रद्द करतानाच खटल्याच्या सुनावणीचे कामकाज शिराळा न्यायालयात चालेल. हे न्यायालय निर्देश देईल, त्यावेळी राज ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर राहण्याचा आदेश निकालपत्रात दिला आहे.