भंगार डेमू प्रवाशांच्या सेवेत; वीजपुरवठा बंद झाल्याने डब्यात अंधार

By संतोष भिसे | Published: March 10, 2024 04:23 PM2024-03-10T16:23:53+5:302024-03-10T16:24:58+5:30

सांगली-कोल्हापूर मार्गावर प्रवाशांची परीक्षा

Bhangar Demu in passenger service; Darkness in the compartment due to power cut in sangli-kolhapur route | भंगार डेमू प्रवाशांच्या सेवेत; वीजपुरवठा बंद झाल्याने डब्यात अंधार

भंगार डेमू प्रवाशांच्या सेवेत; वीजपुरवठा बंद झाल्याने डब्यात अंधार

सांगली : कोल्हापूर ते सांगलीदरम्यान डेमू पॅसेंजर रेल्वेचा प्रवास म्हणजे अडथळ्यांची शर्यत ठरत आहे. शनिवारी सायंकाळी पॅसेंजरमधील दिवे बंद पडल्याने प्रवाशांना अंधाऱ्या डब्यांतून प्रवास करावा लागला. रेल्वे अधिकाऱ्यांना प्रवाशांनी धारेवर धरल्यानंतर अधिकाऱ्यांनी खटपट करुन डब्यांमध्ये वीजपुरवठा सुरळीत केला. 

सातारा ते कोल्हापूर-सातारादरम्यान सकाळी व सायंकाळी धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वेबाबत प्रशासनाची अनास्था संताप आणणारी आहे. डेमूच्या डब्यांमध्ये अस्वच्छता, गाडी विलंबाने धावणे हे प्रकार रोजचेच आहेत. गेल्या काही महिन्यांत डेमू गाडीच्या नादुरुस्त्यांमुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. 

शनिवारी सायंकाळी पावणेसात वाजता कोल्हापुरातून सुटलेली सांगली पॅसेंजर रुकडीमध्ये येताच अंधारात बुडून गेली. डब्यांतील वीजपुरवठा बंद झाला. सर्व दिवे आणि पंखे बंद पडले. प्रवाशांनी मोबाईलच्या बॅटऱ्या सुरु करुन उजेडाचा प्रयत्न केला. यादरम्यान, महिला प्रवाशांना चोरीमारीपासून सावध राहण्याची वेळ आली. 

पुढील स्थानकात दिवे सुरु होतील या अपेक्षेने प्रवासी शांत होते, पण प्रशासनाने कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. अंधारे डबे तसेच धावत राहिले. हातकणंगले स्थानकात कोयना एक्सप्रेसच्या क्रॉसिंगसाठी डेमू थांबली. त्यावेळी प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. त्यांनी अधीक्षकांना धारेवर धरले. त्यानंतर रेल्वे कर्मचारी पाठवून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. सर्व डबे प्रकाशमान झाले.

लाल डेमू भंगारात पाठवा
प्रवाशांनी सांगितले की, लाल डेमूचे इंजिन सतत नादुरुस्त होते. सकाळी धावणारी सातारा-कोल्हापूर पॅंसेंजर हजारो प्रवाशांसाठी महत्वाची आहे. सातारा, सांगली, मिरज, जयसिंगपुरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी, नोकरदार कोल्हापूरला जातात. ही गाडी सकाळी ९.५० वाजता कोल्हापुरात पोहोचण्याची वेळ आहे. पण इंजिनातील बिघाडामुळे सातत्याने विलंबाने धावते. पंधरवड्यापूर्वी तर चक्क बारा वाजता पोहोचली होती. बिघाडामुळे तिची गती मंदावली होती. ताशी २०-३० किलोमीटर या गडीने डेमू धावत होती. या गाडीने प्रवाशांच्या सहनशीलतेची परीक्षा पाहिली. 

तिकीट वाढवा, पण चांगली सेवा द्या
रेल्वेने कोरोनाकाळात वाढवलेले तिकीटांचे दर नुकतेच पूर्ववत केले. मिरज ते कोल्हापूर हे ३० रुपये प्रवासभाडे पुन्हा १५ रुपयांवर आणले. रेल्वेने प्रसंगी भाडे वाढवले तरी चालेल, पण सेवा चांगली द्यावी अशी प्रवाशांची भावना आहे.

Web Title: Bhangar Demu in passenger service; Darkness in the compartment due to power cut in sangli-kolhapur route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.