‘हाताला काम खिशाला दाम’ने दिली भाकरी

By Admin | Updated: August 4, 2014 00:08 IST2014-08-04T00:04:10+5:302014-08-04T00:08:10+5:30

१३२ विद्यार्थ्यांना रोजगार : सांगलीतील रात्र महाविद्यालयाचा उपक्रम

'Bhaashi bhaam khan bhaash bhaam' gave the bread | ‘हाताला काम खिशाला दाम’ने दिली भाकरी

‘हाताला काम खिशाला दाम’ने दिली भाकरी

आदित्यराज घोरपडे-हरिपूर
मजामस्ती करत सहज सोपेपणानं शिक्षण घेणं प्रत्येकाच्याच नशिबी नसतं. काबाडकष्ट करून शिक्षण घेणं आणि नियतीच्या डावपेचांना सामोरं जाणं वाटतं तितकं सोपं नाही. श्रमाला परमेश्वर मानणाऱ्या गोरगरिबांच्या पोरांना दिशा देण्यासाठी येथील एन. डी. पाटील रात्र महाविद्यालयाने एक पाऊल पुढे टाकलं आहे. महाविद्यालयाने राबवलेल्या ‘हाताला काम खिशाला दाम’ योजनेने १३२ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना रोजगाराची दिशा देऊन आयुष्याची भाकरी मिळवून दिली.
कोणी सायकल रिपेअरीचं दुकान घातलं, तर कोणी वेल्डर झालं. कोणाला खासगी नोकरी मिळाली, तर कोणी पंतप्रधान रोजगार योजनेतून उद्योग उभारला. ही सर्व ‘हाताला काम खिशाला दाम’ची किमया. रात्र महाविद्यालय म्हणजे दिवसा नोकरी-धंदा करून रात्री शिकणाऱ्या पोरांचं हक्काचं व्यासपीठ. कॉलेज कॉर्नरवरील एका कोपऱ्यात १९८४ मध्ये रात्र महाविद्यालय सुरू झालं. विविध कारणांमुळे शिक्षणापासून दूर गेलेल्यांना रात्र महाविद्यालयाने मायेची ऊब दिली. या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमर पांडे यांच्या संकल्पनेतून ‘हाताला काम खिशाला दाम’ ही योजना सुरू झाली. चार पैसे मिळवून घरची जबाबदारी पार पाडत शिक्षण कसं घ्यावं, हेच या उपक्रमात शिकवलं. डॉ. अमर पांडे यांनी स्वत: मेहनत घेऊन कष्टकरी पोरांसाठी या उपक्रमाचं एक पुस्तक बनवलं आहे. त्यात लहान-मोठ्या १७३ उद्योगांची माहिती, शासनाच्या सर्व रोजगार योजना, महत्त्वाचे पत्ते, अर्ज कसा करावा आदी सविस्तर माहिती दिली आहे. या पुस्तकाच्या पंधरा हजार प्रती विद्यार्थ्यांना मोफत वितरित करण्यात येणार आहेत. ‘कमवा शिका’ आणि ‘दिशा भविष्याची’ हे उपक्रमही येथे सुरू आहेत.
जिल्ह्यातील एकमेव असणाऱ्या या रात्र महाविद्यालयात वेल्डर, फीटर, सुतार, मेस्त्री, खासगी नोकरदार असे अनेकजण शिक्षण घेतात. शाहू-फुले-आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते असलेले डॉ. अमर पांडे यांनी कष्टकरी, मेहनती विद्यार्थ्यांवर ‘फोकस’ टाकला आहे. गरिबांची पोरं शिकली पाहिजेत, यासाठी हा माणूस धडपडत आहे.

तळागाळापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचण्यासाठी लठ्ठे सोसायटी धडपडत आहे. काम करून शिकणाऱ्या मेहनती विद्यार्थ्यांसाठी एन. डी. पाटील रात्र महाविद्यालयात आम्ही विविध उपक्रम राबवत असतो. ‘हाताला काम खिशाला दाम’ हा उपक्रम निश्चितच कल्याणकारी ठरेल.
- सुरेश पाटील, अध्यक्ष,
लठ्ठे एज्युकेशन सोसायटी

‘लठ्ठे’ने ‘हाताला काम खिशाला दाम’ ही योजना आखली. संस्थेचे सर्व पदाधिकारी व प्राध्यापकांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी होत आहे. लहान-मोठ्या उद्योगांची माहिती आम्ही मुलांना देतो. गोरगरिबांची पोरं शिकून पुढे गेल्यावर मनस्वी आनंद होतो.
- डॉ. अमर पांडे,
प्राचार्य, रात्र महाविद्यालय

रोजगाराची माहिती पुस्तिका तयार
कॉलेज कॉर्नरवरील एका कोपऱ्यात १९८४ मध्ये रात्र महाविद्यालय सुरू झालं. विविध कारणांमुळे शिक्षणापासून दूर गेलेल्यांना रात्र महाविद्यालयाने मायेची ऊब दिली. या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमर पांडे यांच्या संकल्पनेतून ‘हाताला काम खिशाला दाम’ ही योजना सुरू झाली. चार पैसे मिळवून घरची जबाबदारी पार पाडत शिक्षण कसं घ्यावं, हेच या उपक्रमात शिकवलं. या उपक्रमाचं एक पुस्तक बनवलं आहे. त्यात लहान-मोठ्या १७३ उद्योगांची माहिती, शासनाच्या सर्व रोजगार योजना, महत्त्वाचे पत्ते, अर्ज कसा करावा आदी सविस्तर माहिती दिली आहे.

Web Title: 'Bhaashi bhaam khan bhaash bhaam' gave the bread

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.