श्वसनविकारांबाबत वेळीच सावध व्हा...:थेट संवाद
By Admin | Updated: November 18, 2014 23:27 IST2014-11-18T22:18:03+5:302014-11-18T23:27:23+5:30
जागतिक सीओपीडी दिनअनिल मडके यांचे मत

श्वसनविकारांबाबत वेळीच सावध व्हा...:थेट संवाद
वाढते वायुप्रदूषण... धूर आणि धुळीच्या वाढत्या प्रमाणामुळे गेल्या काही वर्षांत वाढलेले श्वसनविकाराचे रुग्ण, त्यावरील उपाय, नागरिकांची सतर्कता या सर्व गोष्टींवर सांगलीचे श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. अनिल मडके यांच्याशी, उद्या (बुधवारी) पाळल्या जाणाऱ्या जागतिक सीओपीडी दिनानिमित्त साधलेला हा थेट संवाद...
जागतिक सीओपीडी दिन कशासाठी साजरा केला जातो आणि त्याचा नेमका अर्थ काय?
- सीओपीडी म्हणजे क्रोनिक अॅबस्ट्रॅक्टिव पल्मोनरी डिसीज म्हणजेच दीर्घकाळ टिकणारा श्वसन व फुफुसाचा विकार. नोव्हेंबर महिन्यातील तिसरा बुधवार हा दिवस जागतिक सीओपीडी दिन म्हणून पाळला जातो.
४हा आजार इतका गंभीर आहे?
- जगभरातील नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या आजारांपैकी पहिल्या क्रमांकाचा आजार म्हणजे हृदयविकार. दुसऱ्या क्रमांकावर मेंदूमध्ये रक्तस्त्राव होणे, ज्याला आपण स्ट्रोक म्हणतो, त्याचा लागतो आणि तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावरील आजार हे श्वसनसंस्थेशी संबंधित आहेत. यातही सीओपीडी हा आजार तिसऱ्या क्रमांकाला आहे. यावरून कुणीही याचे गांभीर्य समजू शकते. त्यामुळेच जागतिक पातळीवर याबाबतचा दिन पाळला जातो.
लोकांना याबाबतची फारशी माहिती नसल्याचे दिसून येते, याचे कारण काय?
- हो. हृदयविकार, मेंदूस्त्राव याप्रमाणे या आजाराबाबत लोकांना गांभीर्य दिसत नाही. धूम्रपान करणाऱ्यांना आणि न करणाऱ्यांनाही विविध माध्यमातून या आजाराला सामोरे जावे लागू शकते. सीओपीडीच्या रुग्णांपैकी ९० टक्के रुग्ण हे धूम्रपान करणारे असतात. सीओपीडीच्या मृत्यूपैकी ९० टक्के मृत्यूसुद्धा धूम्रपानाशी निगडीत असतात. धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींनासुद्धा विविध माध्यमातून या आजाराचा सामना करावा लागतो. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या सान्निध्यात सतत आल्यानेही हा आजार होऊ शकतो. अशा व्यक्तींना पॅसिव्ह स्मोकर असेही म्हटले जाते. त्याशिवाय ग्रामीण व शहरी भागात आजही चुलीचा वापर होतो. चुलीच्या धुरामुळेही सीओपीडी होऊ शकतो. पाणी तापविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बंबातील धूरही तितकाच धोकादायक आहे. ज्या व्यक्ती धुराच्या आणि धुळीच्या सान्निध्यात येतात, त्यांना हा विकार जडू शकतो. रस्त्यावर धुळीत काम करणारे मजूर, रस्त्यावरील छोटे विक्रेते, वाहतूक पोलीस, खडूचा मोठ्या प्रमाणात वापर करणारे शिक्षक, सतत मळणीयंत्र, पिठाच्या गिरणीत काम करणाऱ्या व्यक्ती, तसेच नियमितपणे मैलोन् मैल रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या व्यक्ती यांना याचा धोका संभवतो. घरातील उदबत्ती, धूप कोणत्याही डासप्रतिबंधक उदबत्त्या, क्वाईल, लिक्विड या गोष्टीही या आजाराला निमंत्रण देत असतात.
लोकांनी याबाबत कशी सतर्कता बाळगायला हवी?
- सर्वप्रथम धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींनी धूम्रपान बंद करावे. धूर व धुळीच्या संपर्कात न येण्याचा प्रयत्न करावा. अशावेळी मास्क वापरणे योग्य राहील. धूळ किंवा धूर निर्माण होईल, अशा गोष्टींचा वापर टाळायला हवा. घरात अगरबत्ती लावणे, चुलीचा वापर करणे, बंब पेटविणे या गोष्टी टाळल्या पाहिजेत. घर धूर व धूळविरहीत ठेवावे. डासप्रतिबंधक औषधांचाही वापर धोकादायक असतो. लोकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. सतर्कतेतून चांगले आरोग्य लाभू शकते. आहारात दूध, डाळी असे प्रथिनेयुक्त पदार्थ घेतले पाहिजेत. भरपूर फळे, पालेभाज्या यांचा जेवणात वापर करावा. पोट भरून न जेवता दोन घास कमी खावेत. स्थूलपणा असेल तर वजन कमी करावे. शरीरयष्टी कृश असेल, तर प्रमाणित कोष्टकानुसार जेवण वाढवावे. नियमित व्यायाम, योगासने, विशेषत: प्राणायाम आणि योगातील श्वसनाशी संबंधित आसने केल्यास त्याचा निश्चितपणे लाभ प्रत्येकाला होऊ शकतो. सीओपीडी हा आजार चिवट, दीर्घकाळ टिकणारा व दुर्लक्ष केल्यास त्रासदायक ठरणारा आहे. यावर अनेक प्रकारची औषधे तसेच उपचार पद्धती आहेत. त्याद्वारेही त्यावर नियंत्रण मिळविता येऊ शकते.
४लोकांमध्ये या आजाराबाबतची जागृती आवश्यक आहे, असे वाटत नाही का?
- नक्कीच. जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण जोपर्यंत एखाद्या आजाराचे गांभीर्य लोकांसमोर येत नाही, तोपर्यंत लोकही सतर्क होत नाहीत. श्वसनविकारासंदर्भात जनजागृती होत असली तरी, ती मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे.
सांगली जिल्ह्यातील पर्यावरण आरोग्याच्याबाबतीत कसे आहे?
- वास्तविक पर्यावरणाचा विषय खूप महत्त्वाचा आहे. परंतु, याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही, ही चिंताजनक गोष्ट आहे. मुंबई, पुणे, दिल्ली यासारख्या शहरांच्या तुलनेत सांगलीतील प्रदूषण कमी असले तरी, महत्त्वाच्या रस्त्यांवर, चौकांमध्ये असलेले धुळीचे प्रमाण धोकादायक पातळीच्या वर दिसते. औद्योगिक क्षेत्रातही हवेचे प्रदूषण सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. हवेचे प्रदूषण नियंत्रणात आणण्याचे सध्या कोणत्याही स्तरावर प्रयत्न दिसत नाहीत. दिवसेंदिवस वाढणारी वाहने, रस्त्यांवरील धूळ व अस्वच्छता यामुळे हवेतील प्रदूषणाने आता आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण केला आहे. अशा स्थितीत हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे मला वाटते.
अविनाश कोळी