पावसामुळे रस्त्यांची दाणादाण, स्वखर्चातून शाळकरी मुलांकडून मिरजेत खड्डे बुजवून आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 12:39 IST2022-07-18T12:38:51+5:302022-07-18T12:39:41+5:30
नवीन केलेल्या रस्त्यांचेही पावसात पितळ उघडे पडले आहे.

पावसामुळे रस्त्यांची दाणादाण, स्वखर्चातून शाळकरी मुलांकडून मिरजेत खड्डे बुजवून आंदोलन
मिरज : मिरजेत पावसामुळे रस्त्यांची दाणादाण उडाली असून, रस्त्यांच्या दुरवस्थेकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे. याच्या निषेधार्थ महापालिका लोक अभियानातर्फे किल्ला भाग व लक्ष्मी मार्केट येथे स्वखर्चातून शाळकरी मुलांकडून खड्डे बुजवून आंदोलन करण्यात आले.
महापालिका लोक अभियानचे प्रमुख निमंत्रक ओंकार शुक्ल म्हणाले, मार्केट परिसरातून शाळा, खासगी क्लासेसना जा-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. सायकल व चालत मुले जात असतात. मात्र रस्त्यावरील खड्ड्यामुळे सर्व नागरिक व लहान मुलांना कसरत करावी लागत आहे. नवीन केलेल्या रस्त्यांचेही पावसात पितळ उघडे पडले आहे.
खराब रस्त्यांकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शाळकरी मुलांनी रस्त्यावरील खड्डे बुजविले. यावेळी ॲड. सी. जी. कुलकर्णी, नीलेश साठे, भास्कर कुलकर्णी, सुचिता बर्वे, ज्योती शुक्ल, नर्मता साठे, ज्योती कुलकर्णी, अनघा कुलकर्णी, सुप्रिया जोशी, रूपाली देसाई , महेश नाईक, गोवर्धन राजे हसबनीस, राजन काकीर्डे, शुभम कुलकर्णी, निमीष साठे, नचिकेत साठे, केदार बर्वे उपस्थित होते.