पतंगरावांच्या दरबारी दोन्ही गटांची हजेरी
By Admin | Updated: February 2, 2015 00:14 IST2015-02-01T23:40:55+5:302015-02-02T00:14:37+5:30
पदाधिकाऱ्यांचा सत्कार : पक्षांतर्गत संघर्षाचे चित्र अजूनही कायम...

पतंगरावांच्या दरबारी दोन्ही गटांची हजेरी
सांगली : महापालिकेतील सत्ताधारी गटाचे नेते पतंगराव कदम यांच्या पाचच मिनिटांच्या भेटीसाठी काँग्रेसमधील दोन्ही गटाच्या नगरसेवकांनी रविवारी त्यांच्या निवासस्थानी हजेरी लावली. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून पतंगराव लगेचच गेल्यामुळे, दुसऱ्या गटाला नुसतीच हजेरी लावून परतावे लागले. महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीवेळी इद्रिस नायकवडी यांच्या गटाने पक्षांतर्गत बंडाचे निशाण फडकविले होते. वंदना कदम यांना उपमहापौर पदाच्या निवडणुकीत उतरविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ऐनवेळी त्यांनी माघार घेतली असली तरी, गटबाजीचे निशाण अजूनही फडकतच आहे. रविवारी सत्ताधारी काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांचा सांगलीत धावता दौरा होता. तरीही महापालिकेचे नूतन महापौर विवेक कांबळे, उपमहापौर प्रशांत पाटील, सुरेश आवटी, नगरसेवक दिलीप पाटील व अन्य नगरसेवकांनी दुपारी अडीच वाजता त्यांच्या निवासस्थानी हजेरी लावली. ज्येष्ठ समीक्षक म. द. हातकणंगलेकर यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी कदम सांगलीत आले होते. हातकणंगलेकर यांच्या कुटुंबियांना भेटून ते निवासस्थानी परत आले. त्यावेळी त्यांच्या कक्षात नवे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. बाहेरील बाजूस वंदना कदम व त्यांचे पती सच्छिदानंद कदम उपस्थित होते. इद्रिस नायकवडीही त्याठिकाणी होते. दोन्ही गटांनी सवतासुभा मांडल्याचे दिसत होते. पतंगराव येताच नव्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. तसेच पतंगरावांनी त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. विवेक कांबळे यांना पहिल्या टप्प्यातच महापौरपद देण्याबाबत मदन पाटील यांच्याशी चर्चा झाली होती, असे सांगून त्यांनी कांबळे व पाटील यांना पारदर्शी कारभाराच्या सूचना दिल्या. भेटीचा हा कार्यक्रम पाचच मिनिटात आटोपला आणि पतंगराव निघून गेले. कदम दाम्पत्य व नायकवडी त्याठिकाणीच बाजूला होते. दोन्ही गटातील संघर्षाचा विस्तव अजूनही कायम असल्याचे या भेटीवेळी दिसून आले. पतंगरावांच्याच आदेशाने बंडखोरी केल्याचे वंदना कदम यांनी सांगितले होते.
या विषयाचा उलगडा पतंगराव करतील, असे वाटत होते. मात्र त्यांनी याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. (प्रतिनिधी)
वादावर चर्चा न करताच ते परतले...
स्थायी समिती सभापतीपद निवडीवेळीही नायकवडी यांनी बंडाचा इशारा दिला होता. त्यावेळी संजय मेंढे व नायकवडी यांच्यात समेट घडवून आणण्याचे काम पतंगरावांनी केले होते. नायकवडी यांना त्यावेळी त्यांनी सबुरीचा सल्ला दिला होता. यावेळी महापौर-उपमहापौर निवडीतील वादात न पडणेच पतंगरावांनी पसंत केले. रविवारच्या भेटीतही त्यांनी या विषयावर चर्चा केली नाही. त्यामुळे दोन्ही गटातील संघर्ष अजूनही कायम असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
गटनेते किशोर जामदार यांनी, सत्ताधारी गटातील ज्या सदस्यांनी बंडखोरीचा प्रयत्न केला, त्यांच्यावर कारवाईचा इशारा दिला आहे. त्यांचा रोख इद्रिस नायकवडी, अतहर नायकवडी, शुभांगी कांबळे, वंदना कदम यांच्या दिशेने होता. लवकरच त्यांना नोटिसाही काढण्यात येतील. आता या गोष्टीवरूनही महापालिकेतील पक्षांतर्गत वातावरण तापले आहे. नोटिसा बजावल्यानंतर दोन्ही गटातील संघर्ष आणखी तीव्र झाल्यास त्याचे कोणालाही आश्चर्य वाटणार नाही.