इस्लामपूर : इस्लामपूर आगारातील कामगार संघटनांचे राजकारण पेटलेले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी शिवसेना कामगार संघटनेच्या माध्यमातून बससेवा पूर्ववत सुरू करण्याच्या प्रयत्नाला अद्यापही पाहिजे तेवढे यश आलेले नाही. शनिवारी सकाळच्या सत्रात बसस्थानकामध्ये शुकशुकाट होता. सकाळी दहानंतर पोलिसांच्या मदतीने दोन बस सोडण्यात आल्या.शुक्रवारी पवार, आगार व्यवस्थापक शर्मिष्ठा घोलप-पाटील, पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी कामगार सेना संघटनेच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेल्या काही कामगारांना घेऊन बससेवा सुरळीत करण्याचे प्रयत्न केले. दिवसभरात आष्टा, ताकारी, येडेमच्छिंद्रला बसेसच्या फेऱ्या झाल्या, परंतु त्यांना अद्यापही कामगारांची साथ मिळत नसल्याचे दिसत आहे.शनिवार, दि. २० रोजी सकाळच्या सत्रात बसस्थानकावर एकही बस किंवा कर्मचारी नव्हता. बसस्थानकाबाहेर खासगी वाहनांची रेलचेल होती. नोकरदार आणि विद्यार्थीवगळता प्रवाशांची गर्दी नव्हती. त्यानंतर १० वाजता पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण पन्नासहून अधिक पोलिसांचा ताफा घेऊन इस्लामपूर आगारात आले. एसटीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात ताकारी आणि आष्टा बसेस सोडल्या.
दक्षतेसाठी आगारात पोलीस बंदोबस्तइस्लामपूर आगारातील बस सुरू होण्यासाठी पोलिसांकडून दक्षता घेतली जात आहे. एकही बस फोडली जाऊ नये, याची काळजी घेण्यासाठी आगारात पाच पोलीस अधिकारी, ५० पोलीस कर्मचारी नेमले आहेत. - शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक, इस्लामपूर