आटपाडीची पाणी परिषद आज ऑनलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:19 IST2021-06-26T04:19:45+5:302021-06-26T04:19:45+5:30
वाळवा : पाणी संघर्ष चळवळ व आटपाडी पाणी परिषद यांची २६ जूनला आटपाडी येथे होणारी पाणी परिषद कोरोनामुळे शनिवार, ...

आटपाडीची पाणी परिषद आज ऑनलाइन
वाळवा : पाणी संघर्ष चळवळ व आटपाडी पाणी परिषद यांची २६ जूनला आटपाडी येथे होणारी पाणी परिषद कोरोनामुळे शनिवार, २६ रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाइन पद्धतीने होणार आहे, अशी माहिती निमंत्रक वैभव नायकवडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, ‘‘या ऑनलाइन बैठकीचे अध्यक्ष माजी मंत्री गणपतराव देशमुख आहेत. बंदिस्त पाइपलाइनद्वारे शेतीला पाणी देण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्याची अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी व त्या कामी निधी उपलब्ध करून ती सर्व कामे वेळेवर गतीने पूर्ण करावीत, अशी पाणी संघर्ष समितीची मागणी आहे.
२९ वर्षांपूर्वी डॉ. नागनाथअण्णा यांनी सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील १३ दुष्काळी तालुक्यातील नागरिकांना एकत्रित करून कृष्णेचे पाणी आटपाडी येथे आणण्यासाठी लोकांच्या सामर्थ्यावर जी संघटीत चळवळ उभी केली, त्यातून २०१३ला दुष्काळी भागात पाणी आले आहे. राजकारण सोडून सर्वांनी या चळवळीत योगदान दिले म्हणून अशक्य ते शक्य झाले आहे. ऑनलाइन सभेत सांगोल्याचे चंद्रकांत देशमुख, आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र देशमुख, मंगळवेढ्याचे प्रा. शिवाजीराव काळुंगे, प्रा. डॉ. बाबूराव गुरव, प्रा. बाळासाहेब नायकवडी, ॲड. सुभाष पाटील, चंद्रकांत गायकवाड, प्रा. दत्ताजीराव जाधव, प्रा. दादासाहेब ढेरे, प्रा. विश्वंभर बाबर मार्गदर्शन करणार आहेत.