एकेकाळी दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष, आज ५०० कोटींची वार्षिक उलाढाल; सांगलीतील अशोक खाडेंच्या कर्तृत्वाला पद्मश्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 12:17 IST2026-01-27T12:16:52+5:302026-01-27T12:17:15+5:30
४५ हजारांहून अधिक लोकांना त्यांनी रोजगार दिला. मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांचे ते मोठे बंधू होत

एकेकाळी दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष, आज ५०० कोटींची वार्षिक उलाढाल; सांगलीतील अशोक खाडेंच्या कर्तृत्वाला पद्मश्री
मिरज (जि. सांगली) : एकेकाळी दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष करणारे उद्योजक अशोक खाडे यांनी अपार मेहनत, चिकाटी आणि शिक्षणाच्या बळावर आयुष्याच्या लाटांवर स्वार होत आज ५०० कोटी रुपयांचा वार्षिक व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे सहसंस्थापक व व्यवस्थापकीय संचालक म्हणून यश मिळविले आहे. उद्योगातील यशाबद्दल अशोक खाडे यांना केंद्र शासनाने रविवारी पद्मश्री पुरस्कार जाहीर केला. यानंतर त्यांच्या मूळ पेड (ता. तासगाव) आणि सांगली, मिरज शहरात फटाक्यांची आताषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.
खाडे यांचा जन्म १९५५ मध्ये सांगली जिल्ह्यातील पेड येथील सामान्य कुटुंबात झाला. अत्यंत गरिबीत व उपासमार अनुभवत मोठे झालेल्या खाडे यांनी वडिलांसोबत मुंबईतील मोची कामात हातभार लावला. शिक्षणाचे महत्त्व जाणून त्यांनी प्रथम गावात आणि पुढे तासगाव व मुंबईतून शिक्षण घेतले. आर्थिक तंगीमुळे शिक्षण अर्धवट सोडून माझगाव डॉकमध्ये हॅंडीमन म्हणून रुजू झाले; त्याच ठिकाणी ड्राफ्ट्समन, नंतर गुणवत्ता नियंत्रण कार्यकारी आणि जर्मनीतील तांत्रिक प्रशिक्षणाचा अनुभवही घेतला.
उद्योगाचा स्पष्ट उद्देश समजून घेतल्यानंतर १९९३ मध्ये दत्ता आणि सुरेश या दोन भावांसह खाडे यांनी दास कंपनीची स्थापना केली. व्यवसायाच्या प्रारंभिक टप्प्यात अनेक अडचणींना तोंड देऊन त्यांनी कंपनीला यशाच्या शिखरावर पोहोचवले. आज त्यांच्या कंपनीकडे ओएनजीसी, ब्रिटिश गॅस, ह्युंदाई, एलअँडटी, एस्सार यासारख्या ग्राहकांची मांदियाळी आहे आणि ४५ हजारांहून अधिक लोकांना त्यांनी रोजगार दिला आहे. मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांचे ते मोठे बंधू होत.
उद्योग व व्यापार क्षेत्रात कार्यरत राहतानाच अशोक खाडे यांनी सामाजिक बांधिलकीही जपली आहे. विविध सामाजिक संस्था, गरजू व्यक्ती तसेच समाजोपयोगी उपक्रमांना त्यांनी वेळोवेळी मोठी मदत केली आहे. त्यांच्या उद्योगसाहसासोबतच सामाजिक योगदानाची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.
देशातील प्रेरणास्रोत उद्योजक
१९७५ ते १९९० या काळात त्यांनी माझगाव डॉकमध्ये १५ वर्षांच्या सेवेनंतर उद्योजकतेकडे पाऊल टाकले आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन व तंत्रज्ञानाचे धडे आत्मसात केले. आज डीएएस ऑफ शोअरने १०० हून अधिक सागरी प्रकल्प व्यवसायाच्या यशात समाविष्ट केले असून, गरिबी व अस्पृश्यतेवर मात करीत अशोक खाडे हे देशातील प्रेरणास्रोत उद्योजक ठरले आहेत.