सांगली जिल्ह्यात युरियाची कृत्रिम टंचाई, जादा दराने अन्य खतांचे लिकिंग करून विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 12:58 IST2025-01-04T12:57:41+5:302025-01-04T12:58:11+5:30

शेतकऱ्यांची लूट : कृषी विभाग सुस्त

Artificial shortage of urea in Sangli district, sale of other fertilizers at higher rates | सांगली जिल्ह्यात युरियाची कृत्रिम टंचाई, जादा दराने अन्य खतांचे लिकिंग करून विक्री

सांगली जिल्ह्यात युरियाची कृत्रिम टंचाई, जादा दराने अन्य खतांचे लिकिंग करून विक्री

दत्ता पाटील

तासगाव : जिल्हयात रब्बी हंगामाची कामे जोमाने सुरू आहेत. जिल्ह्यातील तासगावसह विविध भागात ऐन रब्बी हंगामात गरज असताना खत दुकानदारांनी युरिया खताचे कृत्रिम टंचाई केली आहे. खत शिल्लक नसल्याचे सांगून जादा दराने विक्री होत आहे. तर काही कृषी दुकानातून अन्य खते लिंकिंग करून विकली जात आहेत. शेतकऱ्यांच्या राजरोसपणे लूट होत असताना कृषी विभागाने मात्र गांधारीची भूमिका घेतली आहे.

एकट्या तासगाव तालुक्यात ९२ परवानाधारक खत विक्रेते आहेत. यातील काही परवानाधारक विक्रेत्यांकडे युरियाचा तुटवडा आहे. तर काही विक्रेत्यांकडे युरियाचा साठा शिल्लक आहे. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार तालुक्यातील खत दुकानात ८३५ युरिया शिल्लक आहे. प्रत्यक्षात मात्र गरज असताना देखील अनेक दुकानातून युरियाची कृत्रिम टंचाई करण्यात आली आहे. हीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर तालुक्यातही आहे.

यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे, मुबलक पाणी असल्यामुळे रब्बी हंगामाचा चांगला पेरा झाला आहे. रब्बी हंगामात युरियाची शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत असते. मात्र, खत विक्रेत्यांकडून खत उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. काही मोजक्या खत दुकानात युरिया उपलब्ध आहे. मात्र, या दुकानदारांकडून प्रती पोत्यामागे ३० ते ५० रुपये ज्यादा दराने विक्री केली जात आहे.

तर अनेक खत विक्रेत्यांकडून युरिया हवा असेल, तर नॅनो युरिया, नॅनो डीएपी, ऍझोला, बायोला आणि १९ : १९ : १९ या खतांचे लिंकिंग करून सक्ती केली जाते. युरियासाठी काही शेतकऱ्यांना लिंकिंगद्वारे खत घेऊन नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ऐन गरजेच्या वेळी एरिया उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकऱ्याकडून नाराजी व्यक्त होत आहे.

कृषी विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष..

दुसरीकडे तालुक्यात राजरोसपणे जादा दराने खत विक्री आणि लिंकिंगची विक्री सुरू असताना देखील तालुक्यातील कृषी विभागाने मात्र गांधारीची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकाराचे कृषी विभागाच्या अधिका-यांचे सोयीस्कर दुर्लक्ष आहे. याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

तासगाव तालुक्यातील रब्बीचे सरासरी क्षेत्र (हेक्टर) - ९ हजार ४७२
पेरणी झालेले क्षेत्र - १० हजार ३२२
पेरणीची टक्केवारी - १०८.९७ टक्के

युरिया आणि डीएपीची मागणी असलेले क्षेत्र (हेक्टर)
रब्बी ज्वारी - ३ हजार ९५२
गहू - २ हजार ३४२
मका - ७७७

शेतकऱ्यांना वाली कोण? 

यंदा पाऊस चांगला असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी ज्वारी, गहू, मका या पिकांची पेरणी केली आहे. त्यामुळे यंदा तासगाव तालुक्यासह जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त रब्बीचा पेरा झाला आहे. ऐन हंगामात गरजेच्या वेळी तालुक्यात युरियासह डीएपीची देखील टंचाई निर्माण झाली आहे. मात्र, या टंचाई आणि लुटीबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाली कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Artificial shortage of urea in Sangli district, sale of other fertilizers at higher rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.