कृषी अनुदान रॅकेटमधील आणखी एकास अटक, प्रकरणाची व्याप्ती वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 18:07 IST2023-01-20T18:06:51+5:302023-01-20T18:07:14+5:30
रॅकेटमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही सहभाग

कृषी अनुदान रॅकेटमधील आणखी एकास अटक, प्रकरणाची व्याप्ती वाढणार
आटपाडी : कृषी विभागाच्या यांत्रिकीकरण योजनेतून अवजारे खरेदी अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवत शेतकऱ्यांची फसवणूक प्रकरणाची व्याप्ती वाढत आहे. गुरुवारी याप्रकरणी यापूर्वी कोल्हापूर येथून अटक केलेल्या भागेश नांदीवडेकर याचा सहकारी उमेश ऊर्फ तुकाराम प्रकाश लिंगडे (माडगुळे, ता. आटपाडी) यास पोलिसांनी अटक केली. दोघांना आटपाडी प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या समोर हजर केले असता त्यांना २३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.
लिंगडे हा कृषी खात्यांतर्गत विविध अवजारे घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम करतो. लिंगडे व नांदीवडेकर यांनी कृषी विभागाच्या काही अधिकारी व कर्मचारी यांना हाताशी एक साखळीच निर्माण केली होती. प्रत्यक्ष खरेदी न करताच अनुदान लाटले जात होते.
रॅकेटमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही सहभाग
दरम्यान, या सर्व रॅकेटमध्ये कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी सामील असल्याचे नांदीवडेकर व लिंगडे यांनी जबाब दिला आहे. त्यांनी दिलेल्या जबाबातून अनेक धक्कादायक सत्य समोर येणार आहे. आटपाडी तालुक्यातील एका गावातील एकाच कुटुंबातील चार लाभार्थींना नांदीवडेकरने कृषी योजनेचा लाभ झाल्याची चर्चा आहे.