‘एसईबीसी’च्या समावेशासाठी अंगणवाडी भरती प्रक्रिया स्थगित, 'लोकमत'च्या वृत्ताची शासनाकडून दखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 17:10 IST2024-09-12T17:06:37+5:302024-09-12T17:10:05+5:30
‘लोकमत’मधील वृत्ताची दखल घेत राज्य शासनाने भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे आदेश दिले

‘एसईबीसी’च्या समावेशासाठी अंगणवाडी भरती प्रक्रिया स्थगित, 'लोकमत'च्या वृत्ताची शासनाकडून दखल
तासगाव : मराठा समाजाचा ‘एसईबीसी’मध्ये समावेश झाल्यानंतरही, जुन्याच आदेशाप्रमाणे अंगणवाडी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामुळे मराठा समाजातील महिला अर्जदारांवर अन्याय होत होता. याबाबत ‘अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रियेमध्ये मराठ्यांच्या लाडक्या बहिणींवर अन्याय’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मधून विशेष वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची दखल घेत राज्य शासनाने अंगणवाडी भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ‘एसईबीसी’चा समावेश हाेऊन नव्याने प्रक्रिया हाेणार आहे. या निर्णयामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला आहे.
यापूर्वी मराठा अर्जदारांना ‘ईडब्ल्यूएस’मधून आरक्षणाचा लाभ मिळत होता. मात्र, १८ जून २०२४ च्या शासन निर्णयानुसार मराठा समाजाला ‘एसईबीसी’मधून आरक्षणाचा लाभ मिळत आहे. अंगणवाडी भरती प्रक्रियेत प्रवर्गनिहाय अतिरिक्त गुणांकनाचा लाभ दिला जातो. ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गातून यापूर्वी मराठा समाजातील उमेदवारांना अतिरिक्त पाच गुणांचा लाभ मिळतो. ‘एसईबीसी’चा समावेश नसल्याने मराठा समाजातील उमेदवार अतिरिक्त गुणांच्या लाभापासून वंचित राहणार होते.
'लोकमत'च्या वृत्ताची शासनाकडून दखल
याबाबत ‘लोकमत’मधून आवाज उठवण्यात आला होता. त्यानंतर सकल मराठा समाज आणि आमदार सुमनताई पाटील यांनी शासनदरबारी ‘एसईबीसी’चा समावेश करण्याची मागणी केली होती. ‘एसईबीसी’करिता गुणांकन व अन्य बाबी समाविष्ट करून शासन निर्णय सुधारित करण्याबाबत आयुक्तांनी प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावावर अंतिम निर्णय होईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे आदेश दिले आहेत.